You are currently viewing मुळस हेवाळे पुलाची सर्व प्रक्रिया मार्चपर्यंत पूर्ण करण्याची लेखी हमी

मुळस हेवाळे पुलाची सर्व प्रक्रिया मार्चपर्यंत पूर्ण करण्याची लेखी हमी

दोडामार्ग:​

नियोजित मुळस हेवाळे पुलाला मार्च ​२०२१ पर्यंत तांत्रिक मान्यता व अंदाजपत्रक तयार करुन निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची लेखी हमी सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिल्याने मुळस हेवाळे पुलासाठी हेवाळे ग्रामस्थांचे गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेले बेमुदत साखळी उपोषण ​सोमवारी सायंकाळी स्थगित करण्यात आले.
राष्ट्रवादी आणि भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपोषण​कर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याहस्ते लिंबू पाणी ​देवून उपोषण स्थगित करण्यात आले.
लेखी पत्राप्र्माणे ​३१ मार्चपर्यंत दिलेला शब्द बांधकाम विभागाने पाळला नाही तर पुन्हा पूर्वसूचना न देता बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दत्ताराम देसाई, आत्माराम सडेकर, सचिन देसाई, राजाराम देसाई, पास्कू लोबो, भाऊसाहेब देसाई, जयवंत देसाई, राजाराम देसाई, ​​उदय जाधव, सरपंच साक्षी देसाई, उपसरपंच वैशाली गवस, सदस्य समीर देसाई व अश्विनी जाधव,​ ​विलास गवस,आनंद शेटकर, लॉरेन्स डिसोझा, प्रवीण गवस आणि हेवाळे ग्रामस्थांनी दिला आहे.
उपोषणकर्त्यांना दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे,​ मुळस हेवाळे रस्ता हा ग्रामीण मार्ग असून देखभाल व दुरुस्तीसाठी कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सिंधुदुर्ग यांचेकडे आहे. सदर रस्त्यावर साखळी क्रमांक ०/०४० मध्ये ७० मीटर लांबीचा मोठा कॉज​वे असून सदर कॉज​वेचे ठिकाणी मोठ्या पुलाचे बांधकाम करणे या कामास नाबार्ड -२५ मध्ये अंदाजित किंमत रु. ३,४६,३५,०००/- रक्कमेस मार्च २०२० मध्ये प्रशासकिय मान्यता प्राप्त झालेली होती. परंतु मार्च २०२० मध्ये राज्यात कोव्हीड -१ ९चा प्रार्दुभाव असलेमुळे सदर कामाची मंजुरीची प्रत नोव्हेंबर २०२० रोजी प्राप्त झालेली होती. सदर प्रशासकिय मंजुरीच्या अनुषंगाने मा. अधीक्षक अभियंता, संकल्पचित्र मंडळ (पूल) सा. बां. कोकण भवन, नवी मुंबई यांना दि. १७/११/२०२० रोजी सदर कामाचे तांत्रिक मंजुरी अंदाजपत्रक तयार करणेसाठी सर्वसाधारण आराखडा व तांत्रिक टिप्पणी देणेबाबत विनंती करणेत आलेली होती. त्यांच्याकडून अद्याप नकाशे व तांत्रिक टिप्पणी प्राप्त झालेली नाही. त्यामुळे सदर कामाचे तांत्रिक मंजुरी अंदाजपत्रक तयार करणे, निविदा प्रसिद्ध करणे, इ. कामांना वेळ लागणार आहे. असे असले तरीही सदर कामाची निविदा मार्च २०२१ पूर्वी प्रसिद्ध करण्यास​ हे कार्यालय बांधील असेल याची हमी देण्यात येत असल्याने शुक्रवारपासून​ ​(ता.​१२) सुरु असलेले उपोषण मागे घ्यावे अशी विनंती त्यांनी केली होती.​ ​यावेळी शाखा अभियंता विजय चव्हाण,​ ​राष्ट्रवादीचे प्रदीप चांदेलकर, बाबा खतीब, भाजपचे प्रवीण गवस, राजेंद्र निंबाळकर, शैलेश दळवी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा