समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून कणकवलीत २४ जानेवारीला ‘लहान मुलांसाठी खाऊ गल्ली’चे आयोजन;
१ हजार मुलांना मोफत खरेदी कुपन
कणकवली
कणकवली शहरातील लहान मुलांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने ‘लहान मुलांसाठी खाऊ गल्ली’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, २४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जानवली नदीवरील गणपती साना येथे होणार आहे. या खाऊ गल्लीचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष तथा मंडळाचे अध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवलीतील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप शहर अध्यक्ष अण्णा कोदे, राजू गवाणकर, राजा पाटकर, नवराज झेमणे, जावेद शेख, बाळा सावंत, राज नलावडे आदी उपस्थित होते.
या खाऊ गल्ली कार्यक्रमात तब्बल १ हजार लहान मुलांना विविध खाद्यपदार्थ खरेदीसाठी प्रत्येकी ५० रुपयांचे कुपन मोफत दिले जाणार आहेत. तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या मुलांना चॉकलेटचे वाटप करण्यात येणार असून त्यामध्ये आकर्षक बक्षिसांचा समावेश असणार आहे. मुलांसोबत येणाऱ्या पालकांसाठी मराठी व हिंदी गाण्यांचा धमाकेदार ऑर्केस्ट्राही आयोजित करण्यात आला आहे.
स्थानिक नागरिकांना खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यासाठी कार्यक्रमस्थळी मोफत जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याशिवाय लहान मुलांसाठी विविध फनी गेम्स, जादूगाराचे मनोरंजन, गोव्यातील कलाकारांकडून टॅटू काढण्याची सोय, तसेच दोन आकर्षक सेल्फी पॉईंट्सही असणार आहेत.
यावेळी समीर नलावडे म्हणाले की, कणकवली शहरातील नागरिकांनी त्यांच्या राजकीय जीवनात नेहमीच साथ दिली आहे. “निवडणुकीत मतदान केले असो वा नसो, कणकवलीतील प्रत्येक नागरिक माझा आहे. पदावर नसलो तरी कणकवलीकरांशी माझी बांधिलकी कायम आहे. पालक व लहान मुलांच्या अपेक्षेनुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही खाऊ गल्ली कार्यक्रम तेवढ्याच ताकदीने आयोजित केला आहे,” असे त्यांनी सांगितले.
या खाऊ गल्ली कार्यक्रमाला पालकांनी आपल्या लहान मुलांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.
