You are currently viewing ४जी टॉवर तयार, सेवा मात्र बंद

४जी टॉवर तयार, सेवा मात्र बंद

४जी टॉवर तयार, सेवा मात्र बंद

तिरोडा ग्रामस्थांचा संताप, २६ जानेवारीला आंदोलनाचा इशारा

सावंतवाडी

तिरोडा गावात उभारण्यात आलेल्या बी.एस.एन.एल.च्या ४जी मोबाईल टॉवरचे काम पूर्ण झाले असले तरी गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून हा टॉवर अद्याप कार्यान्वित करण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, २६ जानेवारीपर्यंत टॉवर सुरू न झाल्यास संपूर्ण गावासह उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात प्रशासनाला निवेदनही सादर करण्यात आले आहे.
तिरोडा ग्रामपंचायतीकडून यापूर्वी अनेक वेळा पत्रव्यवहार करून ही समस्या मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, टॉवर उभारूनही सेवा सुरू न झाल्याने बी.एस.एन.एल. ग्राहकांना प्रचंड गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. पूर्वी किमान कॉलिंगसाठी उपलब्ध असलेले नेटवर्कही आता मिळत नसल्याने ग्रामस्थांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.
या संदर्भात बी.एस.एन.एल. कार्यालयात तीन ते चार वेळा बैठका होऊनही केवळ आश्वासनांपलीकडे काहीही ठोस निर्णय झालेला नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष न दिल्यास प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी येथील बी.एस.एन.एल. कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
यावेळी तिरोडा सरपंच प्रियांका सावंत, उपसरपंच संदेश केरकर, ग्रामपंचायत सदस्य भास्कर गोडकर, विश्रांती साळगावकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा