हत्ती उपद्रवावर तोडगा काढण्यासाठी आमदारांच्या उपस्थितीत बैठक घेण्याची मागणी
शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांची रानटी हत्ती प्रश्नावर निर्णायक पावले उचलण्याची मागणी
दोडामार्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील दोडामार्ग तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे शेतकरी व ग्रामस्थ हैराण झाले आहेत. हत्तींकडून शेती व बागायतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सततच्या त्रासामुळे नागरिकांकडून आंदोलने व उपोषणेही केली जात आहेत.
या पार्श्वभूमीवर शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी रानटी हत्तींच्या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या विनंतीनुसार यापूर्वी ३ एप्रिल २०२५ रोजी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत कर्नाटक राज्याने यशस्वीपणे राबविलेल्या रानटी हत्ती पकड मोहिमेच्या धर्तीवर दोडामार्ग तालुक्यातही अशीच मोहीम राबविण्याबाबत चर्चा झाली होती.
त्या बैठकीत संबंधित वन अधिकाऱ्यांना हत्ती पकड मोहिमेचा सखोल अभ्यास करून परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करून मुख्य वनसंरक्षक, नागपूर यांच्या मार्फत संबंधित कार्यालयाकडे सादर केला आहे.
सध्या दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यांमध्ये हत्तींचा उपद्रव अधिक तीव्र झाला असून शेतकरी वर्ग पूर्णपणे वैतागला आहे. त्यामुळे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर तातडीने चर्चा करून निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
या अनुषंगाने संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची आपल्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक आयोजित करावी तसेच स्थानिक आमदारांना या बैठकीस आमंत्रित करावे, अशी नम्र विनंती शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी केली आहे. या बैठकीतून लवकरात लवकर ठोस निर्णय होऊन शेतकऱ्यांना रानटी हत्तींच्या त्रासातून मुक्ती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
