विधवा प्रथा न पाळणाऱ्या कुटुंबांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ; सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ऐतिहासिक घोषणा
कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायतीने विधवा महिलांच्या सन्मान, आत्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. पतीच्या निधनानंतर महिलांवर लादल्या जाणाऱ्या अमानवी विधवा प्रथेला ठाम नकार देत, ज्या घरांमध्ये ही प्रथा पाळली जाणार नाही, अशा कुटुंबांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने सर्वानुमते मंजूर केला आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
विधवा प्रथेमुळे महिलांचे सौंदर्य, आत्मसन्मान आणि सामाजिक अस्तित्व हिरावून घेतले जाते. मंगळसूत्र काढून घेणे, बांगड्या फोडणे, कुंकू पुसणे, रंगीत कपड्यांवर बंदी घालणे तसेच आनंदाच्या प्रसंगांपासून दूर ठेवणे अशा अमानवी रूढी आजही काही भागांत आढळतात. या पार्श्वभूमीवर कलमठ ग्रामपंचायतीचा हा निर्णय समाजपरिवर्तनाचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
कलमठ ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी २०२५ च्या वर्षअखेरीस अध्यक्षपदावरून हा ठराव मांडला. ‘महिला स्नेही गाव’ या संकल्पनेनुसार काम करत असताना, विधवा प्रथा बंदीसाठी ठोस पावले उचलणे आवश्यक असल्याचे त्यांनी ग्रामसभेत स्पष्ट केले. कोणत्याही सामाजिक प्रथेपेक्षा माणुसकी श्रेष्ठ असून, स्त्रीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, या भावनेतून हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला झालेल्या ग्रामपंचायत सभेत हा ठराव सर्वानुमते मंजूर झाला. सामाजिक बदल घडवण्यासाठी केवळ उपदेश न करता, आर्थिक सवलतींच्या माध्यमातून सकारात्मक प्रेरणा देण्याचा हा अभिनव प्रयोग असल्याचे मानले जात आहे.
या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे. सामाजिक दबाव किंवा अंधश्रद्धेमुळे कोणत्याही महिलेला अन्याय सहन करावा लागू नये, यासाठी ग्रामपंचायत सक्रिय भूमिका घेणार आहे. जनजागृती, संवाद आणि महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून विधवा प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, पंचायतराज समृद्धी अभियान तसेच शासनाच्या विविध उपक्रमांत सक्रिय सहभाग घेणारी कलमठ ग्रामपंचायत यापूर्वीही स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आली आहे.
या निर्णयामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असून, पुरुषप्रधान मानसिकतेलाही आव्हान मिळणार आहे. पतीच्या निधनानंतरही स्त्रीला सन्मानाने, आनंदाने आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे, ही जाणीव समाजात रुजवणे हेच या ठरावाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सरपंच संदीप मेस्त्री यांनी सांगितले. हा निर्णय केवळ कलमठ पुरता मर्यादित न राहता राज्यभरातील गावांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
