*सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदाची भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होणार?*
*माजी आमदार वैभव नाईक यांचा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार*
*भरती प्रक्रिया रद्द करण्याचा घाट घातल्यास आंदोलनाचा दिला इशारा*
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लिपिक पदाच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहिरात दि.०५/०९/२०२५ रोजी प्रसिद्ध केली होती. या भरतीसाठी सर्व श्रेणीतील उमेदवारांकडून १७७० रु. अर्ज शुल्क आकारण्यात आले होते. सदर भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध होऊन आणि उमेदवारांनी अर्ज करून ४ महिने झाले तरी देखील अद्यापपर्यंत हि भरती प्रक्रिया बँकेने पूर्ण केलेली नाही.त्यामुळे नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन हि भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती का? असा प्रश्न निर्माण होत आहे. ७३ जागांच्या भरतीसाठी जिल्ह्यातील हजारो बेरोजगार युवक,युवतींनी अर्ज केले आहेत. हि भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी. मात्र बेरोजगार युवक युवतींच्या स्वप्नांवर पाणी फेरून भरती प्रक्रिया रद्द करण्याचा घाट घालण्यात येत असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष गप्प बसणार नाही. प्रसंगी अर्ज दाखल केलेल्या हजारो युवक युवतींना घेऊन बँकेसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.
तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी ईमेल द्वारे पत्रव्यवहार करून भरती प्रक्रिया रखडण्याचे कारण काय? भरती प्रक्रियेची सद्यस्थिती काय आहे? आणि हि भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण केली जाणार याबाबत विचारणा केली असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले.
माजी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लिपिक पदाच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहिरात दि.०५/०९/२०२५ रोजी प्रसिद्ध केली होती. या भरतीसाठी सर्व श्रेणीतील उमेदवारांकडून १७७० रु. अर्ज शुल्क आकारण्यात आले होते. सदर भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध होऊन ४ महिने झाले तरी देखील अद्यापपर्यंत हि भरती प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्याची कारणे कोणती आहेत आणि भरती प्रक्रियेची सद्यस्थिती काय आहे? सदर भरती प्रक्रियेत एकूण किती उमेदवारांनी अर्ज भरले आहेत? आणि अर्ज शुल्कापोटी एकूण किती रुपये रक्कम सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडे जमा झाली आहे याची माहिती व सदर भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण केली जाणार याची सविस्तर लेखी माहिती मला देण्यात यावी असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
