गोरेगाव स्टेशनवर माणुसकीचा झरा;
उपासातून मदतीपर्यंतचा प्रेरणादायी प्रसंग
मुंबईतील गोरेगाव रेल्वे स्थानकावर काल एक हृदयस्पर्शी घटना घडली. उपास असल्याने चहा घेण्यासाठी टपरीवर थांबलेल्या एका प्रवाशाच्या आयुष्यात, काही क्षणांतच माणुसकीचा मोठा अनुभव आला.
चहा घेत असताना त्यांचे लक्ष एका लहान मुलाकडे गेले. तो मुलगा सर्वांकडे पाहत होता, मात्र कोणाकडेही काही मागत नव्हता. प्रवाशाने पुढाकार घेत त्याला वडापाव आणि पाण्याची छोटी बाटली दिली. ते घेताच त्या मुलाच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू तरळले. मात्र त्याने ते खाण्याऐवजी आपल्या पिशवीत ठेवले.
कारण विचारल्यावर त्या लहान वयातील मोठेपणाने उत्तर दिले, “माझी आई आजारी आहे. औषध आणायला पैसे नाहीत. ती हे खाऊन पाणी पिऊन झोपेल.” हे ऐकून प्रवाशाच्याही डोळ्यांत पाणी आले.
प्रवाशाने लगेच आईसाठी लागणाऱ्या औषधांबाबत विचारणा केली. मुलाने खिशातील एक चुरगळलेली चिठ्ठी दिली. त्यावरून जवळच्या मेडिकलमध्ये जाऊन तब्बल ३६० रुपयांची औषधे घेऊन त्या मुलाला दिली.
निघताना मुलाने विचारले, “साहेब, किधर के हो?”
त्यावर भावुक होत प्रवाशाने उत्तर दिले, “कोकणातील साहेब. मेरा और मेरे माँ का तुमको दुआ लगेगा!”
या छोट्याशा मदतीतून एका कुटुंबाला आधार मिळाला आणि एका सामान्य प्रवाशाला आयुष्यातील मोठे समाधान. खरंच, देव माणसाच्या रूपात भेटतो, याची प्रचिती देणारी ही घटना गोरेगाव स्टेशनवर अनुभवायला मिळाली.
