श्री पंचम खेमराज महाविद्यालयात ९ व १० जानेवारीला भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
सावंतवाडी :
आजचे युग विज्ञान, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचे असून, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, बदलते प्रवाह समजावेत आणि संशोधनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त) येथे दिनांक ९ व १० जानेवारी २०२६ रोजी भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (माध्यमिक विभाग) मा. कविता शिंपी यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले, कार्याध्यक्षा राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमराजे भोंसले,सावंतवाडीच्या नगराध्यक्षा व संस्थेच्या विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, संस्थेचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत, संचालक प्रा. डी. टी. देसाई, सहसंचालक अॅड. शामराव सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनात वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, भूगोल, मानसशास्त्र, आयटी विभाग, संगणक विभाग, डेटा सायन्स, ग्रंथालय विभाग, क्रीडा विभाग आदी विविध विभागांचा सक्रिय सहभाग असणार आहे. प्रत्येक विभागामार्फत आधुनिक उपकरणे, प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिके, मूलद्रव्यांची ओळख, वनस्पती व प्राण्यांचे नमुने, संगणकीय प्रकल्प, तंत्रज्ञानाधारित सादरीकरणे तसेच प्रयोगांची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना विज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती मिळावी, त्यांच्या मनात जिज्ञासा आणि संशोधक वृत्ती विकसित व्हावी, तसेच भविष्यातील करिअरविषयक दिशा स्पष्ट व्हाव्यात, या हेतूने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी सांगितले. परिसरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी डॉ. व्ही. पी. सोनाळकर (मो. ९४०३४६५१११) यांच्याशी संपर्क साधावा.
