‘सिंधु दर्पण’ गृहनिर्माण प्रकल्पातून पत्रकारांना ओरोसमध्ये हक्काची घरे; अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका
ओरोस (प्रतिनिधी) :
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांची भूमिका अत्यंत मोलाची असून, जिल्ह्याला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी माध्यमांची ठाम साथ आवश्यक आहे, असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले. जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
नारायण राणे यांनी घातलेल्या भक्कम पायावर जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार व्यक्त करत ना. राणे म्हणाले की, दरडोई उत्पन्न वाढवणे, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि पायाभूत सुविधांचा वेग वाढवणे या उद्दिष्टांसाठी शासन कटिबद्ध आहे. या प्रक्रियेत पत्रकारांनी मार्गदर्शक आणि निर्भीड टीकाकार म्हणून आपली भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यातील तरुण पिढीला बरबाद करणाऱ्या अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेत पालकमंत्री म्हणाले, “पालकमंत्री पद स्वीकारताना मला अवैध धंदे बंद करण्याची स्पष्ट जबाबदारी देण्यात आली होती. त्यासाठी कोणतीही राजकीय किंमत मोजायला मी तयार आहे. तरुणांचे भविष्य आणि कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होत असतील तर गप्प बसणार नाही.” या मोहिमेत माध्यमांची साथ महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
भविष्यातील विकास आराखड्याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी जमिनीचा अभ्यास सुरू आहे. २०२९ पर्यंत बाहेर गेलेल्या सुमारे ५० टक्के तरुणांना जिल्ह्यातच रोजगार मिळेल इतक्या संधी निर्माण केल्या जातील. चिपी विमानतळ २४ तास सुरू असून, कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे मार्गासाठीही पुढाकार सुरू आहे. गोव्याच्या धर्तीवर जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न पाच लाखांपर्यंत नेण्याचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.
बाळशास्त्री जांभेकर यांच्या जिल्ह्यात पत्रकारांचे दोन स्वतंत्र कार्यक्रम होणे योग्य नसल्याचे नमूद करत त्यांनी गटबाजी टाळून एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. “मी चुकत असेन तर लेखणीने दाखवून द्या; तुमच्या मार्गदर्शनाची मला नेहमीच गरज आहे,” असे सांगत त्यांनी लोकशाहीतील माध्यमांचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्हा मुख्यालयासह तालुका पातळीवर पत्रकार भवने उभारण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांच्या कल्याणासाठी महत्त्वाची घोषणा करत पालकमंत्री म्हणाले की, ‘सिंधु दर्पण’ पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून ओरोस येथे पत्रकारांना माफक दरात हक्काची घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. येत्या दोन–तीन दिवसांत भूखंड हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होईल. ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, संतोष वायंगणकर, उमेश तोरसकर, शशी सावंत, गजानन नाईक, बाळ खडपकर, संतोष राऊळ आदींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याने हा प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असून, जिल्हा पत्रकार भवनाप्रमाणेच हा गृहनिर्माण प्रकल्पही आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सोहळ्यास जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.
यावेळी जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने देण्यात येणारे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जिल्ह्यातील नऊ पत्रकारांना प्रदान करण्यात आले. यामध्ये देवगड – अयोध्याप्रसाद गावकर, कणकवली – सुधीर राणे, मालवण – अर्जुन बापर्डेकर, कुडाळ – प्रशांत पोईपकर, सावंतवाडी – सागर चव्हाण, वेंगुर्ला – प्रदीप सावंत, सिंधुदुर्गनगरी – लवू म्हाडेश्वर, दोडामार्ग – ओम देसाई, वैभववाडी – महेश रावराणे या नऊही पत्रकारांना मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळ खडपकर यांनी केले. सूत्रसंचालन गणेश जेठे यांनी तर आभार प्रदर्शन संतोष राऊळ यांनी केले.
