विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीत ‘त्विषा 2.0’ महोत्सव उत्साहात संपन्न”
कणकवली
विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवळ – कणकवली येथे आयोजित ‘त्विषा 2.0’ हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अत्यंत उत्साहात व मोठ्या सहभागात पार पडला. या महोत्सवाने फार्मसी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, बौद्धिक व सांस्कृतिक गुणांना उजाळा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
‘त्विषा 2.0’ ही महाराष्ट्रातील फार्मसी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या एका प्रमुख आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाची दुसरी आवृत्ती आहे. असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडिया (एपीटीआय) – महाराष्ट्र राज्य (एपीटीआय- एमएस) द्वारे फार्मसी शिक्षणात उत्कृष्टता, नावीन्य, संस्कृती आणि क्रीडा यांना प्रोत्साहन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले जाते. यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवळ- कणकवली येथे आयोजित महोत्सवात फार्मसी विषयावर आधारित वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी औषधनिर्माण क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान, संशोधनाची वाढती भूमिका, फार्मासिस्टची सामाजिक जबाबदारी, औषध क्षेत्रातील नैतिकता तसेच भविष्यातील संधी व आव्हाने यावर अभ्यासपूर्ण आणि प्रभावी मांडणी केली. विद्यार्थ्यांची वक्तृत्वकला व विषयाची सखोल समज उपस्थितांची दाद मिळवून गेली. तसेच फार्मसी व विज्ञान विषयावरील मॉडेल मेकिंग स्पर्धा ही महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी औषधनिर्मिती प्रक्रिया, ड्रग डिलिव्हरी सिस्टीम, जैवतंत्रज्ञान, मानवी शरीरातील औषधांचे कार्य व वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित नाविन्यपूर्ण आणि माहितीपूर्ण मॉडेल्स सादर केली. प्रत्येक मॉडेलमागील संकल्पना व उपयुक्तता पाहून परीक्षक व उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
यावेळी युवक कल्याण संघ, कणकवली चे सचिव डॉ. रमन बाणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “फार्मसी व विज्ञान क्षेत्रात केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे, तर व्यासपीठावर व्यक्त होण्याची क्षमता, संघभावना आणि नाविन्यपूर्ण विचार महत्त्वाचे असतात. ‘त्विषा 2.0’ हा महोत्सव विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करणारा आहे.” कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून प्रा. विजयकुमार सावंत, प्रा. कृष्णात मोहिते यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम पाहीले. या कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता. यावेळी फार्मसी विषयावर आधारित वादविवाद स्पर्धेत कु. श्रावणी बाणविलकर, कु. विवेक परब, कु. चैतन्य पवार – विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवळ- कणकवली या महाविद्यालयाचा प्रथम क्रमांक आला. तर द्वितीय क्रमांक कु. प्रियांका पवार, कु. देवांगी कुबल, नुमन शेख – पुष्पसेन सावंत इन्स्टीट्यूट ऑफ फार्मसी कुडाळ या महाविद्यालयाचा आला. फार्मसी व विज्ञान विषयावरील मॉडेल मेकिंग व प्रेझेंटेशन स्पर्धेत कु. वरद साडविलकर, दर्शना कालेकर – गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी, सावर्डे या महाविद्यालयाचा प्रथम क्रमांक आला. तर द्वितीय क्रमांक कु. शंकर शिंदे, कु. विश्रुती विचारे – सरस्वती इन्स्टीट्यूट ऑफ फार्मसी, तोंडवली या महाविद्यालयाचा आला.
कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. राजेश जगताप, उपप्राचार्य डॉ. अमोल उबाळे, बी. फार्मसी विभाग प्रमुख श्री. अमर कुलकर्णी, डी. फार्मसी विभाग प्रमुख श्रीम. नमिता सागवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. निखिल गजरे, प्रा. ऐश्वर्या पालव, प्रा. नेहा गुरव व प्रा. ऐश्वर्या कोचरेकर यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. युवक कल्याण संघ, कणकवली चे अध्यक्ष श्री वैभव नाईक, उपाध्यक्षा सौ. स्नेहा नाईक, सचिव डॉ. रमण बाणे आणि व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. मंदार सावंत यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल विशेष अभिनंदन आणि कौतुक केले. या महोत्सवामुळे महाविद्यालयीन परिसरात उत्साहाचे व सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले.
