You are currently viewing दिव्यांग कोळेकर भगिनींसाठी राजघराण्याचा मायेचा हात

दिव्यांग कोळेकर भगिनींसाठी राजघराण्याचा मायेचा हात

दिव्यांग कोळेकर भगिनींसाठी राजघराण्याचा मायेचा हात;

राणी शुभदादेवी व श्रद्धाराजे भोसले यांच्याकडून दोन गाद्यांचे वितरण

सावंतवाडी

गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ एका जीर्ण झोपडीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगणाऱ्या कोळेकर भगिनींना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून चार वर्षांपूर्वी हक्काचे घर मिळाले. आज त्या नव्या घरात सुखाने राहत असल्या तरी अलीकडे नगरपरिषद निवडणूक प्रचारादरम्यान श्रद्धाराजे भोसले यांनी कोळेकर भगिनींच्या घरी दिलेल्या भेटीत एक दिव्यांग भगिनी थंडीमुळे नुसत्या फरशीवर झोपलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
ही परिस्थिती पाहून श्रद्धाराजे भोसले यांनी तात्काळ राणी शुभदादेवी भोसले यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर राणी शुभदादेवी भोसले यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांच्याशी संपर्क साधून दिव्यांग कोळेकर भगिनीसाठी दोन नवीन गाद्यांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.
आज सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडे त्या दोन गाद्या सुपूर्त करण्यात आल्या. प्रतिष्ठानचे सदस्य रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम व पेंटर मंगेश सावंत यांनी कोळेकर भगिनींच्या घरी जाऊन त्या गाद्या त्यांना प्रदान केल्या.
या वेळी कोळेकर भगिनी भावुक झाल्या. “आम्ही खूप भाग्यवान आहोत. राणी सरकारांचे पाय आमच्या दाराला लागले. त्यांनी आमच्या दिव्यांग बहिणीची दखल घेऊन गाद्या पाठविल्या. राजघराण्याने आमच्यावर दाखवलेली ही दया आम्ही कधीही विसरणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी राणी शुभदादेवी भोसले व श्रद्धाराजे भोसले यांचे मनःपूर्वक आभार मानले.
यापूर्वी ज्येष्ठ पत्रकार विजय देसाई यांच्या पुढाकाराने, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, रवी जाधव तसेच क्रीडाई आणि शहरातील दात्यांच्या सहकार्याने कोळेकर भगिनींसाठी पक्के घर, वीज, स्वयंपाकघर, बाथरूम व नळपाण्याची सोय करण्यात आली होती. आज राजघराण्याच्या या संवेदनशील कृतीमुळे सामाजिक बांधिलकीचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा