You are currently viewing पत्रकारितेची गनिमा जपण्यासाठी सत्यनिष्ठा आवश्यक – सीताराम गावडे

पत्रकारितेची गनिमा जपण्यासाठी सत्यनिष्ठा आवश्यक – सीताराम गावडे

पत्रकारितेची गनिमा जपण्यासाठी सत्यनिष्ठा आवश्यक – सीताराम गावडे

व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्गतर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग जिल्ह्याची लाल माती ही अनेक थोर व्यक्तिमत्त्वांची जननी असून त्यातील तेजस्वी रत्न म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्गचे सल्लागार सीताराम गावडे यांनी केले. ‘दर्पण’ या पहिल्या मराठी साप्ताहिकातून जांभेकरांनी समाजप्रबोधनाचा जो दीप प्रज्वलित केला, तो अधिक तेजस्वी ठेवण्याची जबाबदारी आजच्या पत्रकारांवर आहे. त्यासाठी सत्य आणि तत्वनिष्ठ पत्रकारिता जपणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्गच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, सचिव शैलेश मयेकर, कार्याध्यक्ष अनंत धोंड, सहसचिव संजय पिळणकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष सिद्धेश सावंत, प्रसिद्धी प्रमुख कवी दीपक पटेकर तसेच प्रशांत मोरजकर, नाना धोंड, साबाजी परब, आशिष धोंड, श्रीरंग सावंत आदी पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित पत्रकारांचा व्हॉईस ऑफ मीडिया सिंधुदुर्गतर्फे गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
मार्गदर्शन करताना गावडे पुढे म्हणाले की, पाश्चात्य देशांतून येणाऱ्या चरस, गांजा यांसारख्या अमली पदार्थांमुळे सिंधुदुर्गातील तरुण पिढी अधःपाताकडे जात आहे. ही गंभीर समस्या रोखण्यासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीद्वारे ठाम भूमिका घ्यावी. समाजाला योग्य दिशा देण्याचे काम पत्रकारांनी आतापर्यंत केले असून तेच कार्य अधिक ताकदीने पुढे नेण्याची गरज आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील यांनी पत्रकारांमधील एकजुटीचे महत्त्व अधोरेखित करताना ‘एकत्र तर सर्वत्र’ या ब्रीदवाक्याने व्हॉईस ऑफ मीडिया शासन व प्रशासनाकडे पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या संकल्पनांमुळे आज ही संघटना ५६ पेक्षा अधिक देशांत कार्यरत असून, त्याचा भाग असल्याचा अभिमान वाटतो, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पिळणकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन शैलेश मयेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा