You are currently viewing निराधार जेष्ठ नागरिकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून जीवन जगले पाहिजे – ॲड. रुपेश पवार

निराधार जेष्ठ नागरिकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून जीवन जगले पाहिजे – ॲड. रुपेश पवार

मुंबई :

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे युनिटच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. वसंत मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता इशा नेत्रालय येथे पत्रकार बांधवांसाठी नेत्र शिबिराचे आयोजन केले होते त्याचप्रमाणे संध्याकाळी साडेसात वाजता ठाणे महानगरपालिका निराधार केंद्र तीन पेट्रोल पंप या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक पत्रकार एडवोकेट रुपेश पवार यांनी सर्व निराधार ज्येष्ठ नागरिकांना आपल्या सुसंवादातून मंत्रमुग्ध करत. सकारात्मक जीवनाचा मूलमंत्र दिला. या कार्यक्रमात रुपेश पवार म्हणाले. ज्येष्ठ नागरिक म्हणून आपण निराधार आहोत ही भावना मनातून काढून टाका आणि सकारात्मक दृष्टिकोनातून आनंदी जीवन जगा. नवीन वर्षी संकल्प जीवनाचा इथल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी करायला हवा. आपण सर्व ज्येष्ठ नागरिक कुठून ना कुठून आला आहात पण इथे सर्वजण एकत्र राहता. त्यामुळे आपण सर्वांनी एकमेकांना आधार देत विचारांचे आदान प्रदान केले पाहिजे. तुम्ही एखादे पुस्तक दुसऱ्यांना वाचून दाखवा त्यावेळी त्यांचे दुःख त्यांचा आनंद आपल्यालाही समजू शकेल. कारण आपल्यासारखीच भावना प्रत्येकाची असते. त्यामुळे सकारात्मक जगा “या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करा”. कारण आपण ८४ लक्ष वेळा जन्म घेतल्यानंतर माणसात एकदा जन्म घेतो.

त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत जीवनात सर्वांनी आनंदी राहिले पाहिजे. उस्फूर्त होऊन जीवन जगले पाहिजे. कारण हा जन्म पुन्हा आपल्याला लवकर मिळत नाही असे आध्यात्म शास्त्रात सांगितले आहे.

मी अपंग असताना आज तुमच्या बरोबर संवाद करतो आहे. कारण मी जीवनाच्या सर्व अडचणींवर मात करत इथपर्यंत पोहोचलो आहे. शाळा कॉलेजमध्ये मला अनेक मित्र भेटले त्यांच्या सहकार्यातून मी सकारात्मक जीवन जगत आलो.

तसेच सहकारी तुम्हालाही मिळत असतात. त्यांची मदत घेऊन, त्यांच्यावरती कृतज्ञता व्यक्त करा म्हणजे तुमचे जीवन परिपूर्ण होईल. अशाप्रकारे शरीराने दिव्यांग असलेल्या रुपेश पवार यांनी आशादायी जीवनाचा नवीन सूर्यकिरण दिला.

यानंतर रुपेश पवार यांचे वडील बी के पवार यांनी रुपेश यांच्या जीवन प्रवासाबद्दल सांगितले. त्यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचे मन हळहळले. यावेळी बोलताना समाजसेवक राजेंद्र गोसावी म्हणाले रुपेश यांनी अपंगत्वावर मात करून अटक प्रयत्न करून शिक्षण घेत हे सर्व यश मिळवले आहे. रुपेश पवार यांची चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था आहे. या संस्थेमार्फत रुपेश समाजात विचार प्रसाराचे कार्य करतो आहे. म्हणून रुपेश हा माझ्यासाठी राम आहे. आणि मी त्याचा लक्ष्मण आहे या शब्दात राजेंद्र गोसावी यांनी आपले प्रेम व्यक्त केले. कारण रुपेश पवार आणि राजेंद्र गोसावी ही जोडी समाजकार्यात पुढे येऊन कार्य करीत आहे. हातात कोणतेही प्रबळ साधन नसताना समाजाकडून मदत घेत. वंचितांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे काम हे दोघे कायम करत असतात. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे परिवारातील सर्व पदाधिकारी, सदस्य, मान्यवर उपस्थित होते. यावेळी जेष्ठ नागरिकांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा