You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार नेत्रहीन बांधवांसाठी जिल्ह्यातील पहिली स्वयंसिद्धता कार्यशाळा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार नेत्रहीन बांधवांसाठी जिल्ह्यातील पहिली स्वयंसिद्धता कार्यशाळा

*सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार नेत्रहीन बांधवांसाठी जिल्ह्यातील पहिली स्वयंसिद्धता कार्यशाळा*

सिंधुदुर्ग

महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्गच्या वतीने लुई ब्रेल दिनाचे औचित्य साधून दिनांक 07 व 08 जानेवारी 2026 रोजी अंधांसाठी व डोळस कार्यकर्त्यांसाठी दोन दिवसीय स्वयंसिध्दता व सहसंवेदना सजगता कार्यशाळेचे (Mobility & Empathy Awareness Workshop) आयोजन केले आहे. अंध व्यक्तींना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करून त्यांना आपले आयुष्य सुलभ आणि सुकरतेने जगता यावं यासाठी आतापर्यंत महाराष्ट्रातील ७३ आणि बुऱ्हाणपूर (म.प्र.) व नवी दिल्ली येथील एक-एक अशा ७५ स्वयंसिद्धता कार्यशाळा त्यात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत. कोकणातील अनेक अंध व्यक्तींच्या मागणीवरून ही कार्यशाळा सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच होत आहे. या कार्यशाळेत पांढऱ्या काठीची माहिती व उपयोग, पांढरी काठी शास्त्रशुद्ध पद्धतीने वापरण्याचे प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष वापर करण्याचा सराव, इतर ज्ञानेंद्रियांचा वापर सक्षमतेने कसा करायचा याबद्दलची माहिती व प्रशिक्षण, स्पर्शज्ञानाने विविध पदार्थ कसे ओळखायचे हे सर्व प्रशिक्षण देऊन प्रशिक्षणार्थ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकारणही करण्यात येणार आहे. हे सर्व प्रशिक्षण स्वतः स्वागत थोरात देणार आहेत. तर रेवा कदम आणि स्वरूपा देशपांडे या कार्यशाळेच्या समन्वयक व सहाय्यक प्रशिक्षक आहेत.
कार्यशाळेची वेळ दोन्ही दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ अशी असेल. ही कार्यशाळा नाथ पै सेवांगण मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे.अंधांच्या वैयक्तिक जीवनात अमुलाग्र बदल‌ घडवून आणणाऱ्या या स्वयंसिद्धता कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी कोकणातील नेत्रहीन बांधवांनी चुकवू नये व लवकरात लवकर आपले नाव नोंदवावे असे आवाहन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्गचे जिल्हा समन्वयक श्री. अनिल शामू शिंगाडे यांनी केले.
नेत्रहीनांसाठी उपयुक्त अशा या कार्यशाळेबद्दल आधिक माहितीसाठी 9765979450 किंवा 9623655142 या मोबाईल क्रमांकावर अनिल शामू शिंगाडे यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा