सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी चिपी विमानतळ येथे नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध होणे हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल असून, ही सुविधा पर्यटन विकासासाठी माईलस्टोन ठरणार असल्याचे प्रतिपादन विष्णू मोंडकर, अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी केले.
चिपी विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार नारायण राणे तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत. या सुविधेमुळे जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला निश्चितच गती मिळेल, असा विश्वासही मोंडकर यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाल्यानंतर दरवर्षी दहा लाखांहून अधिक पर्यटक, विशेषतः सागरी पर्यटनासाठी जिल्ह्याला भेट देतात. देश-विदेशातील पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी आवश्यक सुविधा राज्य व केंद्र सरकारकडून उपलब्ध होत असून, विमान प्रवासासाठी उपयुक्त असलेल्या चिपी विमानतळाची भूमिका यात अत्यंत महत्त्वाची आहे.
मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या या विमानतळावर बारमाही देशी-विदेशी पर्यटक उतरू शकावेत, यासाठी नाईट लँडिंग सुविधा आवश्यक होती. पालकमंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच विमानतळाच्या विद्युतीकरणासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने आता चिपी विमानतळावर दिवसरात्र विमान वाहतूक सुरू राहणार आहे.
याशिवाय विजयदुर्ग किल्ला वर्ल्ड हेरिटेजमध्ये नोंद झाल्यानंतर जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटनालाही चालना मिळाली आहे. बीच टुरिझमसोबतच जंगल, साहसी, मेडिकल आणि धार्मिक पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. नाईट लँडिंग सुविधेमुळे विमानांची संख्या वाढून प्रवास अधिक सोयीस्कर होणार असून, याचा थेट फायदा होमस्टे, रिसॉर्ट, लॉजिंग-बोर्डिंग व्यावसायिक तसेच पर्यटन क्षेत्रातील शाश्वत व्यवसायांना होणार असल्याची माहिती विष्णू मोंडकर यांनी दिली.
