शाश्वत विकासासाठी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक
मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांचे अणसूर ग्रा.पं. आढावा बैठकीत आवाहन
वेंगुर्ले
“मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामपंचायतींना अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख बनवणे हा आहे. गावाचा सर्वांगीण विकास साधताना केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.” शाश्वत विकासासाठी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी अणसूर ग्रामपंचायत मध्ये घेतलेल्या आढावा बैठकीत केले.
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. रवींद्र खेबुडकर यांनी अणसूर ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट देऊन विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. या भेटी दरम्यान त्यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजाची पाहणी करून उपस्थित पदाधिकारी व ग्रामस्थांना मोलाचे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी वेंगुर्ला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) श्री. वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. दिनेश पाटकर, कृषी अधिकारी श्री. प्रशांत चव्हाण, अणसूरचे सरपंच श्री. सत्यविजय गावडे, उपसरपंच श्रीमती वैभवी मालवणकर, ग्रामविकास अधिकारी श्रीमती सायली सातोसे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी श्री. खेबुडकर यांनी ग्रामपंचायत स्तरावरील प्रशासकीय अभिलेख, राबविण्यात येत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विकास आराखड्याची माहिती घेतली. या भेटीच्या शेवटी त्यांनी अणसूर ग्रामपंचायतीच्या कार्याचे कौतुक केले आणि ‘सम्रुद्ध पंचायतराज’चे उद्दिष्ट गाठण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
