You are currently viewing तिर्लोट आंबेरी माजी विद्यार्थी संघाचे कार्य कौतुकास्पद आणि अभिमानास्पद – सहसंपादक प्रमोद कांदळगावकर

तिर्लोट आंबेरी माजी विद्यार्थी संघाचे कार्य कौतुकास्पद आणि अभिमानास्पद – सहसंपादक प्रमोद कांदळगावकर

ठाणे (प्रतिनिधी) :

निसर्ग सौंदर्याने नटलेल्या देवगड तालुक्यातील तिर्लोट गावचा हा संघ पंचेचाळीस वर्षांपूर्वी ज्या उद्देशाने उदयास आला तो म्हणजे गावची शाळा सुधारण्यासाठी त्यामधून तिर्लोट आंबेरी माजी विद्यार्थी संघाची निर्मिती झाली आणि मुंबई संघ उभारला गेला. मग या उपरोक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक सुविधा बरोबरच आणि ग्राम सुविधा निर्माण करण्यासाठी कटिबद्ध होऊन जे अविरत कार्य सुरू ठेवले ते पाहता कौतुकास्पद आणि तितकंच अभिमानास्पद आहे असे “दर्याचा राजा’मासिकाचे सहसंपादक प्रमोद कांदळगावकर यांनी दि.४ जानेवारी रोजी ठाणे येथील शुभारंभ सभागृहात २२ व्या स्नेहसंमेलन उद्घाटन प्रसंगी गौरव उद्गार व्यक्त केले. प्रारंभी विद्याधर आंबेरकर यांनी प्रास्ताविक करीत आढवा घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे व्याख्याते मनोज मसुरकर, मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद भाबल, कार्याध्यक्ष श्रीधर प्रभू, पुरस्कार प्राप्त शिक्षिका सौ. संगीता आंबेकर, माजी अध्यक्ष दिपक भाबल, सरचिटणीस राजेंद्र पडेलकर, खजिनदार बाळ जुवाटकर आदी मान्यवर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून प्रारंभ करण्यात आला. स्वागताध्यक्ष श्री. प्रमोद कांदळगावकर पुढे म्हणाले की, अशा स्नेहमेळावातून स्नेह जपला जातो त्याहीपेक्षा विखुरलेल्या या शहरातून गावचे गावपण टिकून राहण्यासाठी प्रयत्न होत असतो असे सांगितले. प्रमुख पाहुणे व्याख्याते मनोज मसुरकर यांनी “कुटुंब प्रबोधन ‘ याविषयावर बोलताना ‘हे तुझं ते माझं नकरता सर्व कुटुंब आपलं आहे असे समजून वागल्यास कुटुंब व्यवस्थेची आवश्यकता लक्षात येईल. भारतीय संस्कृतीमध्ये अष्टांग योग सांगितले आहेत त्याचं आजरण करा असे नमूद करून विविध विषयांवर उदाहरणांसह भाष्य केले. अलिकडे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सौ. संगीता आंबेकर यांना शाल, श्रीफळ, पुष्प करंडक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी गावचे सुपुत्र सिनेकलावंत संदिप जुवाटकर, नाट्य कलावंत प्रविण भाबल, लेखिका वर्षा नरेंद्र भाबल, अँड विकास जोशी आदी प्रभृती उपस्थित होत्या. संजय भाबल यांच्यासह कलाकारांनी सादर केलेल्या नुत्य आविष्काराने आंबेरीवासीय मंत्रमुग्ध झाले. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि जेष्ठ नागरिक यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. रंगतदार सोहळ्याचे सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापिका सौ. नेहा लघुतम भाबल यांनी अतिशय माफक शब्दात केले. यावेळी मोठ्या संख्येने आंबेरीवासीय उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा