You are currently viewing पटसंख्येवर शिक्षक कपात अन्यायकारक

पटसंख्येवर शिक्षक कपात अन्यायकारक

पटसंख्येवर शिक्षक कपात अन्यायकारक

वायंगणीत ग्रामस्थांचा शासन निर्णयाविरोधात जनआक्रोश

मालवण

मालवण तालुक्यातील वायंगणी येथे पटसंख्येच्या निकषांवर शिक्षक कपात करण्याच्या शासनाच्या धोरणाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जनजागृती रॅली काढली. वायंगणी ग्रामपंचायत ते ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय या मार्गावर काढण्यात आलेल्या रॅलीनंतर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेचे अध्यक्षस्थान वायंगणीचे सरपंच रुपेश पाटकर यांनी भूषविले.
सभेत कोकणातील भौगोलिक परिस्थिती, वस्तीची विरळता आणि ग्रामीण वास्तव लक्षात न घेता केवळ पटसंख्येच्या आधारे शिक्षक कपात करणे अन्यायकारक असल्याचे वक्त्यांनी ठामपणे मांडले. या धोरणामुळे ग्रामीण भागातील मराठी शाळांचे अस्तित्व धोक्यात येत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कांवर गदा येत असल्याची भूमिका उपस्थितांनी मांडली. शासनाने या निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी सरपंच रुपेश पाटकर, ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष हनुमंत प्रभू, खजिनदार समृद्धी आसोलकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण वायंगणकर, सचिन रेडकर, रसिका सावंत, शामसुंदर नाईक, संजना रेडकर, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर वायंगणकर, उदय दुखंडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हडकर, संस्था सचिव वैभव जोशी तसेच रावजी सावंत यांनी शिक्षक कपात धोरणावर तीव्र शब्दांत टीका केली.
दरम्यान, ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयात पुढील शैक्षणिक वर्षापासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी सभेत एकमताने मंजूर करण्यात आली. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून शासनाची मान्यता मिळविण्याचा ठराव पारित करण्यात आला. बदलत्या शैक्षणिक गरजांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात सक्षम करण्यासाठी सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम आवश्यक असल्याचे मत पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केले.
ग्रामपंचायत वायंगणी ज्ञानदीप शैक्षणिक समन्वय समितीने सेमी-इंग्लिश माध्यम सुरू करण्यासाठी ज्ञानदीप संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. ही जनजागृती रॅली शांततेच्या मार्गाने पार पडली असून विद्यार्थ्यांचे हित, दर्जेदार शिक्षण आणि ग्रामीण शाळांचे अस्तित्व टिकवणे हाच आंदोलनाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
या आंदोलनाचे आयोजन ग्रामपंचायत वायंगणी ज्ञानदीप शैक्षणिक समन्वय समिती व ज्ञानदीप संस्था, वायंगणी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा