You are currently viewing सावंतवाडी माझी कर्मभूमी

सावंतवाडी माझी कर्मभूमी

सावंतवाडी माझी कर्मभूमी;

विकासासाठी दोन्ही नगरपालिकांचे सहकार्य – नगराध्यक्ष राजन गिरप

सावंतवाडी

जन्मभूमी वेंगुर्ला असली तरी सावंतवाडी हीच माझी खरी कर्मभूमी असल्याची भावना व्यक्त करत वेंगुर्ले नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी सावंतवाडीच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. विवेकानंद गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

दीर्घकाळ सावंतवाडीत वास्तव केल्यामुळे येथील प्रत्येक भागाची मला ओळख आहे. त्यामुळे वेंगुर्ल्याइतकेच प्रेम सावंतवाडीवर असून, विकासाच्या प्रक्रियेत दोन्ही नगरपालिकांनी एकत्र काम करावे, असे त्यांनी नमूद केले. सत्काराला उत्तर देताना ते भावूक झाले. वेंगुर्ल्याचे नगराध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच कोणत्याही संस्थेने असा सत्कार केल्याचे सांगत, विवेकानंद सोसायटीने दाखवलेले प्रेम कायम स्मरणात राहील, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात सावंतवाडी नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत-भोसले, नगरसेवक अजय गोंधवळे, नीलम नाईक, विना जाधव तसेच ॲड. अनिल निरवडेकर यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा ममता मोहन जाधव होत्या. प्रास्ताविकात मोहन जाधव यांनी राजन गिरप हे संस्थेचे सदस्य असून नगराध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल सर्व सदस्यांना अभिमान वाटत असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय भाषणात ममता जाधव यांनी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचे अभिनंदन करत नगरपालिका प्रशासन स्वच्छ व पारदर्शक राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच सावंतवाडी शहराच्या प्रवेशद्वारावरील दुर्गंधीची समस्या तातडीने सोडवावी व शहराचे सौंदर्य जपण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा