दहा लाख रुपये व प्रमाणपत्र पारितोषिक देऊनकेला गौरव
मालवण
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग ‘आर. आर. (आबा) पाटील सुंदरगाव पुरस्कार योजनेअंतर्गत सन २०१९-२० तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत मालवण तालुक्यातून हडी ग्रामपंचायतींने प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या हडी ग्रामपंचायतीला दहा लाख रुपये व प्रमाणपत्र असे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
विविध नाविन्यपूर्ण व पर्यावरण पूरक उपक्रम राबविणाऱ्या हडी ग्रामपंचायतीने मालवण तालुक्यात नेहमीच आदर्शवत कामगिरी केली आहे. या पुरस्कारातील निकषांनुसार ग्रामसभा आयोजन, गावातील पाणीपुरवठा सुविधा, शौचालय वापराचे प्रमाण, गुन्ह्यांचे प्रमाण, कोरोना लसीकरण मोहीम, घर ऐवजी रुग्णालयात बाळंतपण आदी व इतर गोष्टीत हडी ग्रामपंचायतीची कामगिरी सरस राहिल्याने या ग्रामपंचायतीने सुंदरगाव पुरस्कार योजनेत तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवीत उल्लेखनीय यश मिळविले आहे.
सुंदरगाव पुरस्काराचा वितरण समारंभ सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय येथे जि.प. अध्यक्षा समिधा नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी हडीचे सरपंच महेश मांजरेकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मालवण पं. स. चे कृषी अधिकारी संजय गोसावी, सागर गोलतकर अजित मुळीक उपस्थित होते. रुपये दहा लाख व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
हडी ग्रामपंचायतीने नेहमीच अभिनव उपक्रम राबविले आहेत. गावचा सर्वांगीण विकास हेच ध्येय ठेवून नेहमी कार्यरत असलेले सरपंच महेश मांजरेकर यांचे हडी ग्रामपंचायतीच्या विविध स्तरावरील यशात मोठे योगदान आहे. सर्वाना सोबत घेऊन गावचा विकास साध्य करताना शासनाकडून निधी मिळविण्यात व त्यातून विविध योजना राबवण्यात मांजरेकर यांचे मोलाचे योगदान आहे. स्मार्ट ग्राम ओळख लाभलेली हडी ग्रामपंचायत भविष्यात जिल्हा तसेच राज्य स्तरावर निश्चितच नावलौकिक मिळवेल, असा विश्वास सरपंच महेश मांजरेकर यांनी व्यक्त केला. हडी ग्रामपंचायतीच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून ग्रामपंचायतीचे, सरपंच महेश मांजरेकर व त्यांच्या ग्रामपंचायत सदस्य सहकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.