*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सारेच वर्ख येथे…*
मागून मिळत नाही दुनियाच ही विराणी
येथे कडक आहे हरएक ती कहाणी..
नात्यात नाही प्रेम साराच हा दिखावा
वाह्यात करती कोणी मैफलीत वाह वावा..
रस्त्यात तो भिकारी अन्नास हाक मारी
उचलून हात कोणी देई न त्यास वैरी
महालात लोड तक्के उधळीत ते प्रच्छन्न
गणतीच नाही तेथ नासून जाई अन्न…
गंगेवरी कुणी तो थंडीत अर्धनग्न
दुलईत उबदार स्वप्नात कोणी मग्न
करतात आत्महत्या नाही बळीस वाली
सत्कार गल्लोगल्ली निर्लज्ज मिरवी शाली…
आहे किती विरोध उपहास ठायी ठायी
वृद्धाश्रमात कोणी ती वाट पाही आई
जातात दूरदेशी मातापिता उदास
म्हणतात भरवितो सोनेरुपेरी घास…
सारेच वर्ख आहे साराच हो मुलामा
नाहीच कोणी येथे नाही कुणी रिकामा
काळच “काळ” झाला सुटका न हो कुणाची
गर्दीच येथे फार करतात बाचाबाची..,
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
