माजगावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरीचा उद्या जत्रोत्सव…
सावंतवाडी
माजगावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या दि. ४ जानेवारीला मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणीची पाठीराखी अशी सातेरी देवीची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी दरवर्षी भाविकांची अलोट गर्दी होते. यावर्षीही दर्शनासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन जय्यत तयारी करण्यात आली आहे.
जत्रोत्सवानिमित्त मंदिरात सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर श्री देवी सातेरीची मूर्ती भरजरी वस्त्रे व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजविण्यात येणार आहे. त्यानंतर देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरली जाईल. या विधीनंतर रात्री उशिरापर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले राहणार आहे.
उत्सवाच्या रात्री सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात येईल आणि त्यानंतर जत्रोत्सवाचे खास आकर्षण असलेल्या पार्सेकर दशावतार कंपनीचे नाटक सादर होणार आहे. या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे मानकरी, ग्राम देवस्थान निधी कमिटी आणि माजगाव ग्रामस्थांनी केले आहे.
