*घारपी शाळेत बालिकादिन विविध उपक्रमांनी बनला आनंददायी दिन*
*बांदा*
घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालिकादिन मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे हा दिवस विद्यार्थ्यांसाठी विशेष आनंददायी ठरला.
समाजात मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणे, बालिकांच्या हक्कांविषयी जागृती करणे तसेच मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’या संदेशाचा प्रभावी प्रसार करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र गावकर, उपाध्यक्ष यशोदा गावडे, ग्रामपंचायत सदस्य आनंद गावडे, मुख्याध्यापक जे. डी. पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणांतून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. शाळेतील सर्व मुलींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या दिवशी विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा तसेच विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण करत मनमुराद आनंद लुटला. तसेच शाळेच्या वतीने सर्व मुलींना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकारी शिक्षक मुरलीधर उमरे, आशिष तांदुळे, धर्मराज खंडागळे, अंगणवाडी सेविका संजना गावकर, मदतनीस अमृता कविटकर, संचिता सावंत, पालक व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
