पण उद्देश मात्र वेगळा… भविष्याच्या गरजेचा !!
सावंतवाडीतला सिंधू आत्मनिर्भर अभियानांतर्गतचा “गोड्या पाण्यातील मत्स्यमहोत्सव” युवावर्गाला आत्मनिर्भरतेचा संदेश कृतीतुन देण्यात शत-प्रतिशत यशस्वी!!!
महोत्सव सिंधुदुर्गला नवीन नाहीत. प्रचंड झगमगाट आणि लखलखाट असलेले कितीतरी कला, क्रीडा महोत्सव या जिल्ह्याने अनुभवले आहेत. सावंतवाडीतल्या मत्स्य महोत्सवातदेखील नृत्य- संगीत- मेजवानीचा तो रूपेरी चंदेरी साज होताच. पण वेगळेपणा होता तो या मत्स्य महोत्सवामागच्या उद्देशात! आणि तो उद्देश सफल करण्यात महोत्सव अगदी शत-प्रतिशत यशस्वी झाला, ही एक फार मोठी जमेची बाजू म्हणता येईल.
नवीन वर्षाची आणि सोबतच महाराष्ट्रात आलेल्या नवीन सरकारची सुरुवात कोरोनाने बाधित झाल्यासारखीच होती. लॉकडाऊननंतर जवळपास थांबलेल्या अर्थव्यवस्थेच्या चाकाला गती देऊन ते कसे ढकलायचे, बेरोजगारीने खचलेल्या मनांना कशी उभारी द्यायची, कसे हे रहाट-गाडगे फिरवायचे याबाबत एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. राजकीय अभिनिवेशाचा भाग नाही, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख ही सगळी परिस्थिती हाताळायला नवखे ठरले, आणि ते प्रशासकीय नवखेपण लपले नाही. सत्तेवर नसूनही भारतीय जनता पार्टी ही विरोधी पक्षनेते श्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात अनुभवाच्या जोरावर महाराष्ट्रभर मदतकार्यात पुढे सरसावली. मदतकार्याच्या प्राथमिकतेला प्राधान्य दिल्यानंतर शहरात बेरोजगार झालेल्या हजारो कोकणवासीय युवावर्गासाठी भाजपाने आत्मनिर्भर अभियान सुरू केले. कोकणातील नैसर्गिक स्थिती आणि उपलब्ध साधनसामग्री याचा विचार करता रोजगाराच्या दृष्टीने कोकणवर आलेला अतिरिक्त ताण कसा कमी करता येईल, यादृष्टीने अभ्यास सुरू झाला. आत्मनिर्भर अभियानाची कोकणची जबाबदारी भाजपा नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक असलेले श्री. अतुल काळसेकर यांच्यावर पक्षाने सोपवली. त्याचे विभागवार नियोजन करत काळसेकर यांनी “सिंधू आत्मनिर्भर अभियान” सुरू केले. या विषयाचे गांभीर्य जाणत माजी राज्यमंत्री, आमदार मा.रविंद्रजी चव्हाण यांनी या विषयात सक्रिय पुढाकार घेतला, आणि खासदार ना. नारायणराव राणे, आमदार नितेशजी राणे, माजी खासदार निलेशजी राणे, जिल्हाध्यक्ष राजनजी तेली अशी दिग्गजांची फळी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची फळी या कामासाठी पुढे सरसावली. ग्रामविकासाच्या क्षेत्रात काम करणारे डॉ.प्रसाद देवधरांसारखे व्यक्तिमत्त्व भगिरथ-कार्याचा अनुभव सोबत घेत या कामात उतरले. त्यातूनच मग हळद लागवड असेल, व्यवसाय असेल, मत्स्यपालन व्यवसाय असेल, प्रत्येकाने आपापल्या परीने त्या योजनांना हातभार लावला.
या अनेक क्षेत्रातील एक विषय होता तो मत्स्यपालनाचा! जिल्ह्याची नैसर्गिक स्थिती कृत्रिम मत्स्यपालनासाठी अत्यंत अनुकूल आहे. गोड्या पाण्यातील मत्स्यपालनाचे अनेक प्रयोग या जिल्ह्यात होतकरू युवावर्गाने सुरू केले. आमदार रविंद्रजी चव्हाण यांनी जिल्हाभर दौरा करत अशा अनेक प्रकल्पांची माहिती घेतली, चर्चा केली. अनेकांना कदाचित माहीत नसेल, पण हे मत्स्यपालनाचे अभिनव प्रयोग त्यांनी आपल्या सावंतवाडीतल्या निवासस्थानीही सुरू करत ते चांगल्या पद्धतीने यशस्वी केले.
सिंधूदुर्गातील लोक हे समुद्रातील माशांचे शौकीन, सरंगा-पापलेट आणि सुरमईचे दिवाने! गोड्या पाण्यातल्या माशांकडे नाही म्हंटले तरी नाक मुरडून पाहण्याची सवय झाली आहे. अशावेळी गोड्या पाण्यातल्या माशांना स्थानिक बाजारपेठ कशी मिळणार हा यक्षप्रश्न होता. एकीकडे सिंधू आत्मनिर्भरता अभियानाच्या माध्यमातून संयोजक अतुल काळसेकर हे उत्पादन वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत होते, त्यासाठी विविध तज्ज्ञांशी सल्लामसलत करत होते, अगदी राहुरीच्या मत्स्यप्रकल्पापर्यंत भेटी देत अभ्यास करत होते, जोडीला “मासा आणि माणूस” ही थीम घेऊन काम करणाऱ्या निलक्रांती संस्थेतर्फे रविकिरण तोरसकरांसारखे उमदे व्यक्तिमत्व, जे पारंपरिक मच्छिमारांचे आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाते, ते या नव्या दिशेने काही वेगळे प्रयोग करत होते. अगदी जिवंत मासे ग्राहकांपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी वेगळ्या व्हॅनची संकल्पना त्यांनी साकारली आणि आ.रविंद्र चव्हाण यांनी त्याचा शुभारंभ करत या नव्या प्रयोगाला प्रोत्साहन दिले. आणि हे सगळे कार्य सिद्धीस नेण्यास समर्थ असल्याचे सावंतवाडी नगराध्यक्ष श्री. संजू परब यांनी आपल्या नेहमीच्याच सामर्थ्याने सर्वाना एकदिलाने सोबत घेत सिद्ध करून दाखवले.
या सगळ्या प्रयोगांना वास्तवात यशस्वी करण्यासाठी स्थानीक बाजारपेठ मिळणे ही महत्वाची गरज होती आणि त्यासाठीच सावंतवाडीच्या या गोड्या पाण्यातील मत्स्यमहोत्सवाचे खरेतर निमित्त होते. या संपूर्ण महोत्सवाकडे बारकाईने पाहिले तर त्यामागचे हे सूक्ष्म नियोजन सहज लक्षात येते.
या महोत्सवाच्या निमित्ताने वेंगुर्ले आणि सावंतवाडीत महिलांसाठी गोड्या पाण्यातील माशांच्या रेसिपीजचे प्रशिक्षण देण्यात आले होते. याच प्रशिक्षित महिलांनी बनवलेल्या रेसिपीज महोत्सवातच पाककला स्पर्धेच्या निमित्ताने सर्वांसमोर आल्या. महिला आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने आत्मविश्वास येण्यासाठीचा हा छोटेखानी पण यशस्वी प्रयोग म्हणता येईल. महोत्सवभर गोड्या पाण्यातील माशापासून बनवलेल्या फिश-क्रिस्पी, फिश फिंगर्स, फिश चिली, फिश बॉल्स, फिश बिर्याणी यांचा जो खमंग दरवळ पसरला होता, त्यामागे ही मेहनत यशाला येत होती. अगदी छोटे छोटे प्रयोग त्यामागचा मोठा विचार दाखवत होते. उदाहरणच द्यायचे झाले, तर ज्या माशापासून चटकदार चिली बनते, त्या माशाचे नाव होते “बासा”! कोकणात बासाचा दुसरा अर्थ “शिळा/ताजा नसलेला” असा होतो. याचाही विचार व्यावसायिकता म्हणून केला गेला, आणि याच महोत्सवात मा. रविंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते या बासा-माशाचा नामकरण विधी पण करण्यात आला, आणि त्याचे नावच “चिली-फिश” ठेवण्यात आले. चटकदार आणि चमचमीत नाव!
या महोत्सवाच्या शुभारंभाला उपस्थिती दाखवणारे भाजपा नेते माजी मंत्री मा. विनोदजी तावडे आणि संघटनमंत्री मा.सतिशजी धोंड व गोव्याचे मुख्यमंत्री मा.प्रमोदजी सावंत म्हणजेच भविष्यात उपलब्ध होणारे मुंबई आणि गोव्याचे मेगामार्केटच, असे म्हणणे वावगे नक्कीच होणार नाही. नियोजनातील या सूक्ष्म बाबी नक्कीच विचारपूर्वक होत्या, यात शंकाच नाही.
तीन विभागात या संमेलनाची अशीच विभागणी झाली होती. माहिती, प्रदर्शन आणि थेट विक्री असे हे तीन विभाग होते. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना, मत्स्य महाविद्यालय मूळदे यांचा व्हर्टिकल क्रॅब फार्मिंग, म्हणजे अगदी घरच्या ड्रॉवरमध्येही खेकडे-पालन असले प्रयोग, मत्स्य तंत्रविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मंगेश शिरधनकर यांचे गोड्या पाण्यातील मत्स्यशेती- एक सुवर्णसंधी, मूळदे महाविद्यालयामार्फत शोभिवंत मत्स्यपालन कार्यशाळा, विद्यार्थ्यांना या संमेलनात सहभागी करून घेण्यासाठी मत्स्य शिल्पकला आणि मत्स्य चित्रकला स्पर्धा यांचे आयोजन, माशांच्या डिशचा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा एकाचवेळी आस्वाद घेता यावा यासाठी भले मोठे फूड-कोर्ट, सिंधुदुर्गातील हॉटेल्समधील आचारी वर्गासाठी गोड्या पाण्यातील माशांच्या रेसिपीजचे प्रशिक्षण, गद्रे मरीनचे रेडी टू इट प्रकारातले मत्स्य-प्रॉडक्टस् असे अनेक विषय माहिती, प्रदर्शन आणि खाद्यजत्रा विक्री अशा आगामी तीन टप्प्याचा विचार करून विभागलेले दिसतात, आणि यासाठी आयोजकांचे खरोखरच मनापासून कौतुकच करावे लागेल.
जिल्ह्यातील सर्वच ठिकाणच्या नागरिकांनी अलोट गर्दी करत गोड्या पाण्यातील मत्स्य संमेलनाच्या या नव्या प्रयोगाला मान्यता दिली. निव्वळ गर्दी करतच नव्हे, तर तीन दिवसांच्या या महोत्सवात तिसऱ्या दिवशी अफाट प्रतिसाद मिळाला, त्या दिवसाचा नेमका आकडा माहीत नाही, पण दुसऱ्या दिवसा अखेरपर्यंत तब्बल सहाशे किलोपेक्षा जास्त गोड्या पाण्यातील माशांचा इथे5 मत्स्यखवैयांनी अक्षरशः फडशा पाडला होता. पूर्ण महोत्सवात एक टनाचे रेकॉर्ड नक्कीच मोडले असेल, आणि ….
हाच या मत्स्य-महोत्सवाच्या यशाचा माईल-स्टोन आहे. वेगळ्या पद्धतीने खवैय्यांच्या पोटात आणि पोटातून मनात उतरण्यात सिंधू आत्मनिर्भरता अभियानाला आलेले हे यश एवढ्यासाठीच महत्वाचे आहे, की ते एका नव्या व्यवसायाला नवी दिशा देणारे ठरणार आहे. एक नवे व्यावसायिक दालन युवावर्गाला उघडून देणारे ठरणार आहे. आणि यासाठीच आत्मनिर्भरतेचा संदेश कृतीतून देणारा हा सावंतवाडीचा गोड्या पाण्यातील माशांसाठीचा मत्स्यमहोत्सव शंभर टक्के यशस्वी झाला असेच म्हणावे लागेल. त्रुटी असतील, अनेक गोष्टी राहून गेल्या असतील, तरीही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आर्थिक विकासाचा हेतू अभिप्रेत धरून आखलेल्या या एका स्तुत्य उपक्रमासाठी, त्याच्या यशस्वीततेसाठी राबलेल्या ज्ञात-अज्ञात सर्व हातांचे आणि त्यामागच्या मनांचे कौतुक करावे तेवढे थोडेच !!
*—– अविनाश पराडकर, सिंधुदुर्ग*
९४२२९५७५७५