*कोमसाप केंद्रीय कार्यकारिणीच्या ज्येष्ठ सदस्या कादंबरीकार वृंदा कांबळी लिखित अप्रतिम लेख*
*स्त्रियांच्या उद्धाराचा ध्यास घेतलेल्या सावित्रीबाई फुले*
” खरच तू ग्रेट आहेस! ” या माझ्या मैत्रिणीच्या सुलूच्या वाक्याने माझे विचारचक्र सुरू झाले. मी लिहिलेली पुस्तके, मला मिळालेले पुरस्कार, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह हे सारे पाहून सुलू माझी प्रशंसा करण्यात थांबत नव्हती. मी मात्र अंतर्मुख झाले होते.हे सर्व गुण केवळ माझेच आहेत काय? मला आठवत राहिली माझी आई, आजी, अशिक्षित असलेल्या स्त्रिया अज्ञानाच्या अंधारात चाचपडणार्या. त्यांच्याही मागे पणजी, खापरपणजी त्याच्याही मागे असलेल्या स्त्रिया. या स्त्रिया आजच्या युगात असत्या तर त्यानी पुस्तकं लिहिली असती, व्यासपीठं गाजवली असती. पण तसं घडल नाही. अनेक बंधनानी जखडलेल्या, अन्याय सहन करीत मूकेपणाने जगल्या आणि कधीतरी अंधारात संपून गेल्या. मग स्त्रियांच्या जीवनातील अंधार संपून त्याना ज्ञानाचा प्रकाश मिळून त्यांची व्यक्तिमत्वे विकसित होण्याची सुरूवात झाली असेल कुठून?
माझे विचारचक्र सुरू झाले आणि मी जाऊन पोहोचले एकोणिसाव्या शतकात. क्रांतिकारक, शिक्षणतज्ञ, विचारवंत, सामाजिक कार्याची अग्रदूत अशा युगस्त्री सावित्रीबाई फुले यांच्यापर्यंत.आज शिक्षणाने प्रगल्भ बनलेल्या स्त्रिया सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत. आज कोणतेही क्षेत्र असे राहिलेले नाही की जिथे स्त्रियांनी आपली गुणवत्ता सिद्ध केलेली नाही. शिक्षणाने प्रगल्भ बनलेली स्त्री आज व्यक्तिमत्व विकसित करून आपली सक्षमता सिद्ध करत आहे. मग पूर्वीच्या स्त्रियांकडे माझ्या आईकडे, आजीकडे व तिच्याही पूर्वीच्या स्त्रियांकडे गुणवत्ता नव्हती का? तर ती गुणवत्ता होती. पण अज्ञान, अंधश्रद्धा, रूढीप्रियता,पुरूष प्रधानत्व इत्यादी अनेक गोष्टींमुळेच त्याना अबला संबोधले जाई. पण शिक्षणाने ज्ञानाचे अमृतसिंचन होऊन स्त्रीच्या आंतरिक शक्तींची अभिव्यक्ती होऊ लागली व तिचे रूपच पालटले.
भारतातील प्रथम प्रशिक्षित मुख्याध्यापिका, व स्त्री शिक्षणाचा आग्रह धरून व्यापक पातळीवर त्याचा प्रसार करणार्या थोर क्रांतिकारक स्त्री म्हणून सावित्रीबाईंचे स्थान अढळ आहै. त्यांचे शिक्षणविषयक विचार, शैक्षणिक कार्य, सामाजिक क्षेत्रात झोकून देऊन केलेले विविधांगी कार्य पाहिले की सावित्रीबाई समोर मन नतमस्तक होते.
तीन जानेवारी 1831 या दिवशी सातारा जिल्ह्यातील, खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे नेवासे पाटील यांच्या घरात जन्मलेल्या व लाडाकोडात वाढलेल्या सावित्रीने असामान्य धैर्य दाखवून पुढे अतुलनीय अशी सामाजिक कार्ये केली. समाजाच्या नवनिर्मितीचे स्वप्न पाहून समाजहिताचे कठोर धेय्य उराशी जपणार्या युगप्रवर्तक स्त्रिया फारच दुर्मिळ असतात. अशा ध्येयवेड्या माणसाना अग्निकुंडात जणू स्वतःच्या सुखाची आहुती द्यावी लागते. अशीच अग्निपरीक्षा सावित्रीबाई यानी दिली.पारंपारिक कालबाह्य विचार, प्रथा, परंपरा, श्रद्धा इत्यादी गोष्टी पायदळी तुडवून पोलादी विरोधाला न जुमानता, समाजसुधारणेचे रणशिंग त्यानी फुंकले. सामाजिक कार्याचे हे सतीचे वाण उचलणारी एक युगस्त्री ही महाराष्ट्रकन्या आहे याचा महाराष्ट्राला अभिमान आहे. त्यानी शिक्षणाचे महत्व स्वतः तर ओळखलेच पण आपल्या पर्वततुल्य कार्यातून त्यानी शिक्षणाचा महामंत्र स्त्रियांना दिला. शिक्षण क्षेत्रातील त्यांची प्रदीर्घ सेवा, अध्यापक, मुख्याध्यापिका म्हणून बजावलेली तळमळीची सेवा, यातून शिक्षण क्षेत्रालाच त्यानी मौलिक विचार दिलेत. समर्पित वृत्तीने त्यानी शिक्षण क्षेत्राला स्वतःहून वाहून घेतले. शेण चिखल यांचा मारा झेलूनही त्यावेळच्या ध्येयापासून जराही विचलित झाल्या नाहीत.
सावित्रीबाईंची पत्रे, भाषणे, त्यांचे गद्य लेख व काव्य इत्यादी अभ्यास केल्यावर स्त्रियांच्या उद्धाराची त्यांची प्रखर निष्ठा लक्षात येते. त्यांची स्त्रीशुद्रांविषयीची तळमळ जाणून घेता येते. स्त्रियांचा उद्धार स्त्रियांनीच स्वतःच केला पाहिजे.हे तत्त्व त्यानी स्त्री मुक्ती आंदोलनासाठी वापरले होते. त्यांचे गद्य लेखन व काव्यलेखन हे स्त्री शुद्रांच्या परिस्थितीविषयी कळवळयाने भरलेले आहे. स्त्री व शुद्ध यांच्या उद्धाराचा त्यांचा ध्यास होता. सामाजिक समस्यांवर त्यानी सखोल चिंतन केलेले आहे. पत्रलेखनातून सामाजिक कार्याचा ध्यास लक्षात येतो. त्यानी ज्योतिबांच्या पत्रांचे व भाषणांचे उत्कृष्ट संपादनही केले. सावित्रीबाईंच्या स्त्रीमुक्ती आंदोलनाचे कृतिशील स्वरूप पाहून थक्क व्हायला होते. सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यानी बालकल्याण गृह सुरू केले. अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. विधवांच्या गुप्त बाळंतपणासाठी स्वतःच्याच घरात स्वतंत्र जागा बांधून घेतली. ज्योतिबा फुले यांच्या डोक्यातून निघणाऱ्या अनेक सामाजिक कल्पनांची अंमलबजावणी सावित्रीबाई फुले करत असत. विधवा विवाहाचे कार्य ज्योतिबानी सुरू केले. स्त्री संघटनेची स्थापना करून सावित्रीबाईनी ज्योतिबांच्या कार्याला भरघोस सहकार्य मिळवून दिले. प्रौढ स्त्रियांचे शिक्षण, कुमारी माता, परित्यक्ता, विधवा विवाह, बालकल्याण प्रतिबंधक कार्य, बालजरठ विवाह, अस्पृष्यतानिवारण इत्यादी विविध समस्यांकडे लक्ष वेधून यावर चर्चा घडवून आणत. विधवांच्या केशवपनाला विरोध करण्यासाठी केशवपन करणार्या लोकाना संपावर जाण्यास भाग पाडले.
एका लेखात सावित्रीबाईःचे समग्र कार्य वर्णन करता येणार नाही. फक्त विषयाचा उल्लेख केला. सावित्रीबाईनी कठोर आव्हानांना सामोरे जाताना त्या आव्हानावर स्वार झाल्या. त्यानी सामाजिक कार्यांचे उभारलेले हे पर्वत पाहिले की मनात विचार येतो सर्वत्र प्रतिकूलतेचा अंधार असताना सावित्रीबाईनी ही आव्हाने कशी पेलली असतील? कुठून आली असेल ही उर्जा?तर ती त्यांच्या आंतरिक ध्यासातून आलेली होती. समाजसुधारणा त्यांचा ध्यास होता. तोच त्यांचा श्वास होता.
स्त्रीमुक्ती आंदोलनाची गंगोत्री होत्या सावित्रीबाई.
आजच्या स्त्रिया सावित्रीबाईंच्या सदैव ऋणी राहातील अशी भरीव कामगिरी त्यानी केलेली आहे. आजच्या काळातील समस्या बदलल्या आहेत. स्त्रीमुक्ती आंदोलनाचा चेहरामोहराच आज बदलला आहे. स्त्री शिक्षणाचा आज व्यापक पातळीवर प्रसार झाला आहे.स्त्रिया जागृत झाल्या आहेत. आहेत.हे सगळेच स्वागतार्ह आहे. पण तरीही परित्यक्ता, हुंडाबळी, बेकारी, अपवादात्मक अशिक्षितता, अपंग मुलींच्या शिक्षणाची समस्या, सुरक्षितता, घटस्फोटांचे वाढते प्रमाण अशा समस्या काही प्रमाणात आहेतच. अशा समस्या शोधून काढून त्यावर उपाय योजना करणे हीच सावित्रीबाईना दिल्ली श्रद्धांजली ठरेल.
तीन जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिन स्त्रीमुक्तीदिन म्हणून मानला जातो.
आज समाजात वाढती गुन्हेगारी , माणसाची वाढती आत्मकेंद्री वृत्ती, व्यसनाधीनता, अशा अनेक विनाशक गोष्टी गाजरगवताप्रमाणे वाढत आहेत. आज सामाजिक समस्यांचे स्वरूप बदलले आहे तरी ते भयावह आहे. सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यानी सामाजिक कार्याचा व त्यागाचा फार मोठा आदर्श समोर ठेवलेला आहे. स्त्री मुक्तीची त्यांची कल्पना खूपच व्यापक होती. स्त्रियांनी शिकून केवळ आर्थिक हातभार लावावा असे नाही तर स्त्रीने सर्व प्रकारच्या गुलामगिरीतून मुक्तता करून घ्यावी. चांगले विचार , संस्कार शिक्षणातून आपण घेऊन ते घरातील इतरानाही द्यावेत. एक स्त्री शिकली तर एक घर शिकेल ही त्यांची कल्पना होती. त्याचे अनुकरण करताना आजच्य प्रगल्भ बनत असलेल्या काळात कुटुंबातून सामाजिक बांधिलकीचे विचार घराघरातून पोचले तर सामाजिक समस्या कमी होण्यास मदत होऊ शकेल.स्त्रियांमध्ये फार मोठी शक्ती असते. स्त्रियांनी एक विशिष्ट उद्दिष्ट समोर ठेवून संघटितपणे काम केले तर अनेक विधायक कामांचे डोंगर समाजात उभे राहातील. आज काही प्रमाणात स्त्री संघटना ही कामे करत आहेत.ते कौतुकास्पद आहे. पण याचे प्रमाण यापेक्षा वाढले पाहिजे. सावित्रीबाईंच्या असीम त्यागातून आपल्याला मिळालेल्या व्यक्तिस्वातंत्र्याचा सामाजिक विचारांसाठी उपयोग करूया. व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक नसावा. असे घडले तर सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली असे होईल व कृतज्ञतेच्या भावपुष्पांची ओंजळ वाहिली असे होईल.
आज सावित्रीबाई नसतील पण त्यांच्या कार्याच्या प्रेरणेतून अनेक सावित्रीबाई निर्माण होतील. त्या सामाजिक समस्यांच्या शृंखला खळखळा तोडतील.असा विश्वास आज बाळगूया.
सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन .
