54 पैकी 42 मृतदेह हाती; SDRF कडून बचावकार्य सुरू –
वृत्तसंस्था
मध्य प्रदेशच्या सिधी येथे आज (मंगळवार) सकाळी 54 प्रवाशांनी भरलेली बस बाणसागर कालव्यात पडली. आतापर्यंत 42 मृतदेह हाती लागले आहेत. या अपघातातील ६ जण वाचले आहेत. बसचा चालक स्वत: पोहत बाहेर आला. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. बसचालक मार्ग बदलून बस अरुंद रस्त्यावरून घेऊन जात होता, अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे. काही मृतदेह वाहून गेल्याचीही शक्यता आहे.
बस सिधी येथून सतनाकडे जात होती. हा अपघात रामपूरच्या नायकिन भागात सकाळी 7.30 च्या सुमारास झाला. अपघातानंतर चार तासांनी सकाळी 11.45 वाजता बसला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. या कालव्याची खोली 20 ते 22 फूट आहे. अपघात घडला तेव्हा पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे प्रवाशांना सावरण्याची संधी मिळाली नाही.
मृतांमध्ये 12 विद्यार्थ्यांचा समावेश आहे, ते सर्वजण रेल्वेची परीक्षा देण्यासाठी सतना येथे जात होते.
मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये 32 जण बसू शकत होते, परंतु त्यात 54 प्रवासी भरले होते. बस सिधी येथून छूहियामार्गे सतनाकडे जाणार होती, परंतु येथे रहदारी जास्त असल्यामुळे चालक बसचा मार्ग बदलून कालव्याच्या काठावरुन बस घेऊन जात होता. हा रास्ता अतिशय अरुंद आहे.
राज्य आपत्ती निवारण दल (SDRF) ची टीम बचाव कार्य करत आहे. गोताखोर देखील उपस्थित आहेत. कालव्यात पाण्याचा वेग जास्त असल्याने बचाव पथकाला पाण्याची पातळी खाली येण्याची प्रतीक्षा करावी लागली. जोरदार प्रवाहामुळे लोक घटनास्थळापासून वाहत दूर गेले असावेत, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सध्या बाणसागर धरणातून कालव्याचे पाणी बंद करण्यात आले आहे.