You are currently viewing कोकण विकासाला नवी उंची — चिपी विमानतळावर २४x७ नाईट लँडिंगला हिरवा कंदील

कोकण विकासाला नवी उंची — चिपी विमानतळावर २४x७ नाईट लँडिंगला हिरवा कंदील

IFR परवानगीमुळे चिपी विमानतळ रात्रंदिवस कार्यान्वित; पार्किंग क्षमता दुप्पट

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला यश

कणकवली :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग विमानतळ, चिपीने विमानवाहतूक क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. डीसीजीए (DCGA) कडून आयएफआर (IFR) ऑपरेशन्सना मंजुरी मिळाल्याने आता या विमानतळावर २४ तास, सर्व ऋतूंमध्ये सुरक्षित विमानसेवा सुरू राहणार आहे. नाईट लँडिंगला परवानगी मिळाल्यामुळे विमानतळाची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढली असून, पार्किंग क्षमता ३ वरून ६ विमानांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

डिसेंबर महिन्यात सुमारे ११ हजार प्रवाशांनी चिपी विमानतळाचा वापर केल्याने सिंधुदुर्ग विमानतळ देशातील ७५ प्रमुख विमानतळांच्या यादीत मानाने स्थान मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. लवकरच मुंबई–सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू होण्याचा मार्गही मोकळा झाला असून, यामुळे पर्यटन, उद्योग व रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळणार आहे.

नाईट लँडिंगसाठी आवश्यक असलेल्या विद्युत पुरवठ्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनातून २.५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीमुळे विमानतळावरील वीजपुरवठा सुरळीत झाला आणि पुढील तांत्रिक मंजुरी मिळणे सुलभ झाले.

यासाठी नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वेळोवेळी मोलाचे सहकार्य करत केंद्र सरकार व नागरी उड्डाण मंत्रालयाशी आवश्यक संवाद व पत्रव्यवहार राज्य सरकारकडून पूर्ण केला.

या समन्वयात्मक प्रयत्नांमुळे चिपी विमानतळाला नाईट लँडिंगची परवानगी मिळाली असून, कोकणच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा