त्या’ गॅस पाईप लाईनच्या खोदाईमुळे नागरिकांना नाहक त्रास का? ;
नगरसेविका नीलम नाईक झाल्या आक्रमक, ठेकेदारासह नगरपरिषद प्रशासनाला विचारला जाब!
सावंतवाडी :
शहरातील अनेक भागातील रस्त्यावर गॅस पाईप लाईन खोदाईमुळे वाहन चालक व पादचारी यांच्या सुरक्षिते विषयी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. प्रभाग क्रमांक ९ च्या मोरडोंगरी, गणेशनगर येथे क्रेटा मोटार गाडीचा अपघात झाला असून सुदैवाने जीवित हानी झाली नाही मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या प्रभागाच्या नगरसेविका नीलम नाईक यांनी संताप व्यक्त केलाय. केवळ रोलर फिरवून रस्ता पूर्ववत न केल्यास पुढील काम शहरात करू देणार नाही व होणाऱ्या परिणामास संबंधितना जबाबदार धरण्यात येईल, असे नगरसेविका सौ. नीलम परिमल नाईक यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान नगरसेविका नीलम नाईक यांनी स्वतः घटनास्थळी तात्काळ धाव घेत संबंधित कंत्राटदार, नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांना जागीच बोलावून जाब विचारला. तसेच पाण्याची पाईप लाईनला इजा न पोहचता व सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, या विषयी उपयुक्त सूचना देखील केल्या. दरम्यान, दोन दिवसात रस्ता पूर्ववत करून देण्याची संबंधित कंत्राटदार यांनी प्रशासन अधिकारी यांच्या समक्ष हमी दिली आहे. या वेळी माजी सभापती अँड. परिमल नाईक व स्थानिक रहिवासी मोठया संख्येने उपस्थित होते.
