राजकोट किल्ल्यावर पर्यटकांसाठी दिलासा; बायो टॉयलेटची सुविधा कार्यान्वित
सहदेव बापर्डेकर यांनी सोडवला राजकोट किल्ल्यावरील पर्यटकांचा महत्त्वाचा प्रश्न
मालवण
ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पाहण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. मात्र, किल्ला परिसरात स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांनी पुढाकार घेत येथे बायो टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
राजकोट किल्ल्यावर वाढणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीमुळे मूलभूत सोयीसुविधांची गरज प्रकर्षाने जाणवत होती. स्थानिक नागरिक व पर्यटकांनी स्वच्छतागृहाबाबतची मागणी नगरसेवक बापर्डेकर यांच्याकडे केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी नगरपरिषदेकडून बायो टॉयलेटला मंजुरी मिळवून घेतली.
मंजुरीपुरते न थांबता, बायो टॉयलेटची जोडणी व आवश्यक व्यवस्था स्वखर्चातून आणि स्वतः लक्ष घालून पूर्ण करण्यात आली. त्यामुळे आता किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना तातडीची व आवश्यक सुविधा उपलब्ध झाली आहे.
पर्यटकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले असून, ऐतिहासिक स्थळावर मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल नगरसेवक सहदेव बापर्डेकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक पर्यटकांनी त्यांचे आभार मानले आहेत.
