*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*शाकंभरी नवरात्र*
!! या देवि सर्व भुतेषु क्षुधारूपेण संस्थिता,
नम: तस्यै, नम: तस्यै, नम: तस्यै नमो नम: !!
दुर्गा देवीच्या विविध रुपांपैकी एक महत्त्वाचं रूप म्हणजे शाकंभरी देवी म्हणजेच देवी अन्नपूर्णा…
शाकंभरी देवी आदिशक्तीचंच एक रूप मानलं जातं. शाकंभरी नवरात्रात अन्नपूर्णेची आराधना केली जाते…
शाकंभरी नवरात्र पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते..
पौष शुद्ध सप्तमीच्या दिवशी शाकंभरी देवीचे नवरात्र सुरू होते… शाकंभरी देवीला अत्यंत दयाळू आणि विनम्र रूप मानलं जातं… हिचे दुसरे नाव ‘”बनशंकरी”‘ असे आहे. या बनशंकरीचे विजापुरातील बादामी येथे मंदिर आहे. या काळात तिथे फार मोठा रथोत्सव असतो. वर्षभर दर शुक्रवारी तिची पालखी काढली जाते.
शाकंभरी देवीच्या नवरात्रोत्सवात भाज्यांचा नैवेद्याला विशेष महत्त्व आहे…
पौष शुक्ल सप्तमीपासून पौर्णिमेपर्यंत या देवीचा नवरात्रोत्सव भक्तीपूर्वक
साजरा करतात. पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीला साठ भाज्यांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. म्हणून या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असे म्हणतात… या सणाच्या निमित्ताने अनेक भाज्यांचा आस्वाद घेता येतो.
देवीस्तुतीच्या अकराव्या अध्यायात आदिशक्तीच्या ज्या रुपांचं वर्णन केलं गेलंय त्यातीलच एक महत्त्वाचं हे रूप आहे. शाकंभरी देवीला चार भुजांची आणि काही ठिकाणी अष्टभुजा रुपात दर्शवलं गेलंय… शाकंभरी नवरात्रात देवी अन्नपूर्णेची साधना केली जाते.. शाकंभरी देवी म्हणजे अन्न-देवता..
देवी अन्नपूर्णेच्या अद्भुत रूपाची कथा ती अशी की — एकदा पृथ्वीवर १०० वर्ष पाऊस न झाल्यानं दुष्काळ पडला होता. पृथ्वीवर खाण्यासाठी अन्नाचा एकही दाणा उपलब्ध नव्हता. या समस्येमुळे त्रासलेल्या ऋषींनी आदिशक्तीचं स्तवन केलं त्यांच्यावरील संकट बघून देवीनं अयोनिजाचं रूप घेतलं. या अवतारात देवीला १०० डोळे होते. आपल्या १०० डोळ्यांनी देवीनं ऋषी आणि सामान्यांचे दु:ख बघितले. यानंतर संकटात असलेल्या आपल्या सर्वांचे कष्ट दूर करण्यासाठी देवी शाकंभरी रूपात प्रकटली. देवीचं हे विराट रूप होतं. या रुपामध्ये देवीच्या संपूर्ण शरीरावर विविध प्रकारची झाडं आणि भाज्या होत्या. जोपर्यंत पाऊस पडला नाही तोपर्यंत संपूर्ण पृथ्वीवर शाकंभरी देवीनं आपल्या शरीरावरील भाज्या व झाडांमुळे सर्वांचे प्राण वाचवले.( माहीती संकलीत)
अलिकडच्या काळात आरोग्याबद्दल समाज सजग झाला आहे. आहाराचे संतुलन आणि वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञदेखील फळे, भाज्या, कोशिंबिरी, भाज्यांचे, फळांचे रस घेण्याचा सल्ला देतात आणि लोकं ऐकतातही बरं..
*शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा*
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी– ठाणे@
9870451020
