कणकवली फोंडा येथे दुचाकी अपघातात राजापूरातील युवकाचा दुर्दैवी मृत्यू
कणकवली
राजापूर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी गनी खतीब यांचे सुपुत्र अमान गनी खतीब (वय २१) यांचा कणकवली तालुक्यातील फोंडा येथे झालेल्या दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी सकाळी सुमारे १०.३० ते ११.०० वाजण्याच्या दरम्यान महामार्गावरील फोंडा–उंबरट फाट्यावर हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, अमान खतीब हे बुधवारी सकाळी कामानिमित्त दुचाकीवरून सावंतवाडी येथे गेले होते. सावंतवाडीकडून राजापूरकडे परतत असताना फोंडा–उंबरट फाटा येथे त्यांच्या दुचाकीची ट्रकला मागून जोरदार धडक बसली. या अपघातात अमान यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच राजापूर शहरातील अनेक व्यापारी, तसेच अमान यांचे मित्रपरिवार कणकवलीकडे रवाना झाले. या दुर्दैवी घटनेमुळे खतीब कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अमान यांच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. राजापूरचे माजी नगरसेवक सलाम खतीब यांचे अमान हे पुतणे होत. या घटनेबाबत परिसरात शोककळा पसरली आहे.
