*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार ज्येष्ठ साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट*
भाग: ४६
*थर्टी फर्स्ट*
“अवनू तुझो थर्टी फर्स्ट खय?” काकल्याने आल्या आल्याच मला प्रश्न टाकला.
“माझा म्हणजे?तुझ्या कॅलेंडरात वेगळं आहे काय?” मी म्हणालो.
“नाय, पून मिया उत्साव करणय नाय?” काकल्याने स्पष्ट केले.
“अरे उद्या 31 डिसेंबर. वर्ष संपतय. सगळेच उत्सव करतात. त्यात काय वावगं?” मी प्रतिप्रश्न केला.
“कित्याक? तुमका सण कमी पडले काय? आणि सोरो खावनच् थर्टीफस करूक होयो काय ?” काकल्याच म्हणणं बरोबर होतं. पार्ट्या करणं, दारू पिणं हे गैर आहे आणि तेच वाढलय; पण इंग्रजी असेना का, नववर्षाचे स्वागत करू नये अशा मताचा मी नाही. जोवर आपण इंग्रजी कॅलेंडर वापरतोय, तोवर दुराग्रह बरोबर नाही. ऑफिस, शाळेच्या सुट्ट्या, वेळापत्रकं, इन्कम टॅक्स रिटर्न, सेवानिवृत्ती असे अनेक व्यवहार आपण इंग्रजी कॅलेंडरनुसार करतो. मग एक वर्ष संपताना लोकं नाचली तर चूक काय? अर्थात तसं मी काकल्याला विचारलंच.
“अरे नया वर्षाच्या स्वागताबद्दल मी हुन्नय नाय. जुना सरताना जल्लोष कित्याक? आपून गुढीपाडव्याक नया वर्षाचा स्वागत करतो मां? फाल्गुन अमवाश्येक नाय करणो. तशी आपल्यात पद्धत नाय.” काकल्या कडाडला.
“अरे, आपले उत्सव तिथीनुसार. तिथी सूर्योदयाने सुरू होते. इंग्रजी कॅलेंडर रात्री १२ वाजता बदलते.” मी समजावत म्हणालो.
“पून तुमी एक जानेवारीक काय करतांस? काय करतल्यात तेका धरबंद होयो मा? नया वर्सात ते जातत चर्चीत आणि तुमचो रातचो सोरो उतारणा नाय. एक जानेवारीच्या सूर्योदयाक तुमी खाटीर आडये, नायतर बाथरूमात ओकारे काडीत आसतांस. खोटा काय?” काकल्या मला सोडत नव्हताच, उलट खोडून काढत होता.
“मग काय करूया?” मी शेवटी विचारलेच.
“एक तर थर्टी फर्स्ट करूच ने; पून वाटताच तर फर्स्ट जानेवारी करा, काययरी नवीन करून. येक जानेवारीक एखादा झाड लावन्, अन्नदान करून, गावची शाळा झाडून, वृद्धाश्रमात जावन् असा कायपण आपून करू शकतो. आपलो पाडवो मंगलमय आसता, तसो १ जानेवारी पून प्रसन्न आसूचो, असा माझा म्हणणां. ” काकल्या आपलं तर्कट मांडून निघाला. अर्ध्यावर शाळा सोडलेला काकल्या जीवनाच्या शाळेतला मात्र मास्तर असावा, असं मला वाटलं.
*विनय वामन सौदागर*
आजगाव, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
9403088802
