मालवण तहसीलदारपदी गणेश लव्हे यांची नियुक्ती…
मालवण
गेल्या दीड महिन्यापासून रिक्त असलेल्या मालवण तहसीलदार पदावर गणेश दादासो लव्हे यांची नियुक्ती करण्यात आली असून, काल दुपारी त्यांनी आपला पदभार स्वीकारला. मालवणच्या तत्कालीन तहसीलदार वर्षा झाल्टे यांना मुंबई शहर उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांनी ११ नोव्हेंबरला पदभार सोडला होता. तेव्हापासून हे पद रिक्त होते आणि प्रभारी अधिकाऱ्यांमार्फत कामकाज पाहिले जात होते.
नूतन तहसीलदार गणेश लव्हे यांनी यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी मलकापूर येथे तहसीलदार पदाचा अतिरिक्त पदभार सांभाळला होता. तसेच त्यांनी मंगळवेढा येथे नायब तहसीलदार म्हणून आणि सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातही आपली सेवा बजावली आहे. लव्हे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. शासनाने त्यांना पदोन्नती देऊन मालवणच्या तहसीलदार पदाची जबाबदारी सोपवली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर मालवणमधील विविध सामाजिक संस्था, राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. पूर्णवेळ तहसीलदार मिळाल्याने तालुक्यातील प्रशासकीय कामांना आता गती मिळणार आहे.
