You are currently viewing नववर्षांत उत्तम संकलना सत्यात उतरवा

नववर्षांत उत्तम संकलना सत्यात उतरवा

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री पत्रकार मेघा कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*नववर्षांत उत्तम संकलना सत्यात उतरवा*

 

“नवा सूर्य नवी दिशा, नवे संकल्प नवी आशा, जिद्द प्रयत्नां सोबतीने, होऊ दे प्रारंभ यशा, मनोकामना होवो पूर्ण, स्वागत करता नववर्षा.” जुनेपुराणे सोडून देत नाविन्याचे आकर्षण आणि नव्याचा स्वीकार करणे ही तर नैसर्गिक भावना. सरत्या वर्षाला निरोप देत, येणाऱ्या नववर्षाचे स्वागत याचे नियोजन डिसेंबर महिन्यापासून सुरू होतेच. प्रत्येक वर्षाचा येणारा अनुभव वेगळा, चांगल्या-वाईट घडणाऱ्या घटना, प्रसंग हे तर जीवनाचे विविध पैलू. मानवी मन वेगळ्याच विश्वांत वावरत असते, अचानकच जाणीव होते की, मला या वर्षाने काय दिले? कोण कोण कसे वागले, काय बोलले? याची एक प्रकारची उजळणी होत रहाते. चांगले अनुभव फार कमी वेळां लक्षांत रहातात, वाईट मात्र सदोदित सलत रहाते. खरे तर सगळे विसरून पुढे जाण्यांत, चालण्यांत एक वेगळांच आनंद असतो.

प्रत्येक दिवसही नवी शिकवण देऊन जातो, दिवसागणिक असे म्हणायचे झाले तर व्यक्ती किंवा प्रसंगानुसार आपलेही वागणे बदलत असते. भ्रमणध्वनीवर येणारे संदेश फक्त आपली आठवण आहे हे दर्शवत असतात. जे काही चालू वर्षांत घडले, त्यांतून काहीतरी नवीन शोधले तरी बऱ्याच वेळा दृष्टीकोनही बदलतो. कटुअनुभवासही तितक्याच सहजतेने स्वीकारता आले पाहिजे. कारण हेच अनुभव जीवनांत काय करू नये हे शिकवत असतात. अविरत संघर्षाला तोंड देत एखादा मित्र किंवा मैत्रीण तितक्याच ताकदीने आयुष्यांत पुनश्च उभे राहण्याचा प्रयत्न करतात. विचार केला तर हे केवढं मोठं धैर्य आहे न डगमगता, न रडता स्वीकारलेलं. मोहमयी जगांत फसवणूक होऊन एखाद्याची दुर्दशा होते, पण आला दिवस काढणे असे असतानाही, जगणे अपरिहार्य म्हणूनच हा खरा जीवनपथावरचा योद्धा.

आयुष्यांला कलाटणी देणारी संधी कधी ना कधी मिळतेच. नववर्षांत कार्यरत राहण्यासाठी अनेक उत्तम संकल्पना प्रत्यक्षांत आणण्याची मनाची जोरदार तयारी होत असते, पण प्रयत्न अखंड हवेत मग यशाची किनार सापडते. भौतिकसुखाला दृश्य स्वरूप देणाराही रात्रंदिवस झटत असतो, त्याच्या कष्टांचाही अभिमान वाटला पाहिजे. सहजासहजी चांगले जीवन कुणाच्याही वाट्याला येत नाही. स्पर्धेचं मनातलं कलुषित रूप काढून टाकून प्रगतीचा मार्ग कसा खुला करता येईल याचा निर्णय घेता आला की, मग मात्र स्पर्धा स्वत:शीच सुरू होते. अनाकलनीय विचारांचा प्रवाह योग्य दिशा दाखवत रहातो. वेळ, कालावधी प्रत्येकाच्या आयुष्यांत असतात त्यांत असे लक्षांत येते की सुसंस्कारीत मन वाईट वेळ असताना धीर धरते तसेच चांगली वेळ आली म्हणून गर्वही करत नाही.

दिवसांतला एक एक प्रहर, त्याचे सौंदर्य कधीच कमी होत नाही. नववर्षच काय, नवीन दिवसही जगताना महत्वाचा असला पाहिजे. जसे निसर्गातील प्रत्येक दैनंदिन घटना वर्षानुवर्षे आपल्याला आनंद देत असतात तसे आपल्या अस्तित्वाने आनंद पसरवता आला पाहिजे असे मनोमन वाटत रहाते. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना, लेखन करताना आपोआप या गीतपंक्ती कागदावर अवतीर्ण झाल्या. “आजि सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनु.”

 

©मेघनुश्री [लेखिका,पत्रकार]

भ्रमणध्वनी : ७३८७७८७५१२

प्रतिक्रिया व्यक्त करा