फोंडाघाट रस्ता रुंदीकरणावर बाजारपेठेचा विरोध
आधी एसटी स्टँड रस्ता मोठा करा – अजित नाडकर्णी
फोंडाघाट येथे सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर अजित नाडकर्णी यांनी विरोध करणाऱ्या नागरिकांची समजूत काढण्याची भूमिका घेतली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता मोठा केला तरी बाजारपेठेतील समस्या तात्काळ सुटणार नाहीत, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
नाडकर्णी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे मागणी केली आहे की, बाजारपेठेतील रस्त्यावर काम सुरू करण्याआधी एसटी स्टँडसमोरील रस्ता प्रथम रुंद करावा. जोपर्यंत एसटी स्टँड परिसरातील रस्ता मोठा होत नाही, तोपर्यंत बाजारपेठेतील रस्त्याला हात लावू नये, असे त्यांनी सांगितले.
या मागण्यांसाठी आपण मुंबईत पालकमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही नाडकर्णी यांनी सांगितले. तसेच हवेली नगरमधील किऱ्याचा आंबा हा परिसरात असल्याने त्यालाही संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येणार आहे.
या विषयावर मंत्री नितेशजी राणे सकारात्मक विचार करतील आणि फोंडाघाटमधील रस्ता व बाजारपेठेची समस्या मार्गी लागेल, असा विश्वास अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केला.
