हत्तीच्या कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी आठ दिवसांत उपाययोजना करा – आमदार दीपक केसरकर यांचे वन विभागाला आदेश
सावंतवाडी
हत्तीबाधित भागातील वाढत्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर आज आमदार दीपकभाई केसरकर यांच्या कार्यालयात हत्तीबाधित गावांतील शेतकरी, सरपंच व शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीस उपवनसंरक्षक लाड, वनक्षेत्रपाल श्री. पाटील तसेच वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या वेळी तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस यांनी हत्तींच्या कायमस्वरूपी बंदोबस्ताबाबत शासन स्तरावर नेमकी काय कार्यवाही सुरू आहे, असा सवाल उपस्थित केला. त्यावर उपजिल्हा प्रमुख राजेंद्र निंबाळकर यांनी गेल्या वीस वर्षांत वन विभागाने केलेल्या उपाययोजनांचा जाब विचारत, कोट्यवधी रुपये खर्च करूनही ठोस परिणाम का दिसत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला.
तालुका संघटक गोपाळ गवस यांनी हत्तींच्या हालचालींबाबत गंभीर आरोप करत सांगितले की, पूर्वी जुलै महिन्यात घाटमाथ्यावर गेलेले हत्ती काही महिन्यांत परत जात असत. मात्र यावर्षी संपूर्ण वर्षभर हत्ती याच भागात ठेवले गेले. परतीच्या प्रवासात असलेल्या हत्तींना पुन्हा या भागात आणण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. गणेश नावाचा हत्ती अत्यंत रागीट झाला असून नागरिकांवर धावून येत असल्याचे सांगत, यामुळे काही अनुचित घटना घडल्यास वन विभाग जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला.
यावर आमदार दीपक केसरकर यांनी वन विभागाला स्पष्ट आदेश देत हत्तींच्या समस्येवर तत्काळ उपाययोजना करून आठ दिवसांत ठोस कारवाई करण्यास सांगितले.
यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ओंकार हत्ती पकडण्याबाबत न्यायालयीन आदेश असूनही वन विभागाने दिरंगाई केल्याचा मुद्दा उपस्थित केला. काही हत्तीप्रेमींनी न्यायालयात जाऊन हे आदेश रद्द करून घेतल्यावरही वन विभागाने त्या आदेशाला आव्हान का दिले नाही, असा सवाल करण्यात आला. यावर उपवनसंरक्षक लाड यांनी पुन्हा न्यायालयात जाऊन आदेशाला आव्हान देण्याचे आश्वासन दिले.
हत्तींसह इतर रानटी प्राणी तिलारी भागात सोडले जात असल्याचा आरोप करत, माकड, रानडुक्कर, कोल्हे, बिबटे, साप आदी प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीबाबतही चर्चा झाली. विशेष रेंजर टास्क फोर्स स्थापन करावी, नुकसानभरपाई तत्काळ मिळावी, अशा मागण्या करण्यात आल्या. तसेच तळकट–कुभवडा रस्त्याच्या वनजमिनीतील भूसंपादनाबाबत नागपूर कार्यालयात प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सांगत, तो तातडीने मंजूर करून घेण्याचे आश्वासन देण्यात आले.
या बैठकीस गणेश प्रसाद गवस, प्रेमानंद देसाई, राजेंद्र निंबाळकर, शिलेश दळवी, गोपाळ गवस, अनिल शेठकर, राजेंद्र गवस, नंदू टोपले, रामदास मेस्त्री, दादा देसाई, विशाखा नाईक, पूजा देसाई, समीर देसाई, भगवान गवस, अमर राणे, विजय गावडे, बाळकृष्ण गवस, विठोबा पाळ्येकर, सूर्या गवस, सुनील गवस आदी उपस्थित होते.
