*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वनराई ही ….*
वनराई ही चला वाढवू सारे
वनराईचे लावू या नारे…
जोपासू झाडे वेली
किती गोड बोलती बोली
जाताच जवळी खेटून
घासती अंग चाटून
प्रेमळ भाषा त्यांची समजून घ्यारे…
वनराई ही…
आम्ही दिसता सळसळ करती
डोलती अंग हलविती
मूक ती भाषा अंगाची
हिरव्या पिवळ्या रंगाची
भरभरूनी देती सारे घ्यारे
वनराई ही…
जगतात आपुल्यासाठी
बनतात आंधळ्या काठी
बाळास झुलविती झुला
पाळणा तयांचा केला
धनधान्ये ती महामुर देती रे
वनराई ही…
सोबतीस कोणी ना येतो
पण वृक्ष तो जाळून घेतो
राख ती आपल्या साठी
साक्षात असे जगजेठी
पालनकर्ता प्राणवायु देतो रे
वनराई ही…
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
