You are currently viewing ‘मळगाव इंग्लिश स्कूल’मध्ये गुरु-शिष्यांच्या नात्याचा भावूक जागर

‘मळगाव इंग्लिश स्कूल’मध्ये गुरु-शिष्यांच्या नात्याचा भावूक जागर

‘मळगाव इंग्लिश स्कूल’मध्ये गुरु-शिष्यांच्या नात्याचा भावूक जागर

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

सावंतवाडी । प्रतिनिधी :

ज्या शाळेने आयुष्याचा पाया रचला, ज्या गुरुजनांनी ज्ञानाची अक्षरे गिरवून घेतली आणि ज्या मैदानाने मैत्रीचे धडे दिले, त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मळगाव येथील शैक्षणिक वारसा जपणाऱ्या ‘मळगाव इंग्लिश स्कूल’चा भव्य माजी विद्यार्थी स्नेहमेळावा रविवारी अत्यंत उत्साहात पार पडला. गुरुवंदना आणि ऋणानुबंधांचा अनोखा संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात माजी विद्यार्थ्यांची नोंदणी आणि अल्पोपहाराने झाली. मुख्य सोहळ्याचा प्रारंभ ईशस्तवन आणि स्वागतपद्याने झाला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन करण्यात आले. प्रास्ताविकात माजी विद्यार्थी परिवाराचे उपाध्यक्ष प्रभाकर तेली यांनी मेळाव्यामागची भूमिका मांडली, तर सचिव महेश गांवकर यांनी अहवाल सादरीकरणातून संस्थेच्या वाटचालीचा आणि प्रगतीचा आढावा घेतला.

 

*’गुरुवंदना’: सोहळ्यातील भावूक क्षण*

या मेळाव्याचे मुख्य आकर्षण ठरला तो म्हणजे ‘गुरुवंदना’ सोहळा. शाळेत आजवर ज्ञानदानाचे पवित्र कार्य केलेले माजी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना माजी शिक्षक जयप्रकाश प्रियोळकर भावूक झाले. ते म्हणाले, “आजारापणामुळे घराबाहेर पडणे कठीण होते, तरीही विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर मी आलो. आजच्या युगात सामान्य ज्ञान आणि वाचन संस्कृती जपली पाहिजे. विद्यार्थ्यांनी विनम्रता राखावी आणि पालकांनी मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे.” यावेळी त्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी शुभेच्छा दिल्या.

माजी मुख्याध्यापक बी. एस. मुळीक यांनी आवाहन केले की, “मी या शाळेचा विद्यार्थी आणि शिक्षकही राहिलो आहे. सध्या इमारतीचे नूतनीकरण सुरू असून, माजी विद्यार्थ्यांनी या कार्यात सढळ हाताने मदत करून शाळेचे वैभव जपावे.”

*ज्येष्ठ विद्यार्थ्यांचाही सन्मान*

केवळ शिक्षकच नव्हे, तर शाळेच्या पहिल्या पिढीतील म्हणजेच वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या विविध क्षेत्रातील १० ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

तसेच, एसएससी परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल करणाऱ्या अमिषा ओमप्रकाश तिवरेकर हिचा माजी सभापती रमेश गांवकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. माजी विद्यार्थी सूर्यकांत सांगेलकर यांनी असे मेळावे दरवर्षी व्हावेत, अशी भावना व्यक्त केली.

*अध्यक्षीय मनोगत व नूतनीकरणाचा संकल्प*

माजी विद्यार्थी परिवाराचे अध्यक्ष शेखर पाडगांवकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “प्रियोळकर सरांनी शिकवलेली प्रमेयं आजही आमच्या मनात कोरलेली आहेत. सरांच्या आशीर्वादासाठी लागलेली रांग हेच त्यांच्या शिकवण्याचे यश आहे. आम्ही ‘भरत’ होऊन प्रशालेच्या सेवेसाठी तत्पर आहोत. शाळेच्या नूतनीकरणाची जबाबदारी आम्ही पूर्ण करू, मात्र त्यासाठी सर्वांच्या साथीची गरज आहे.”

या सोहळ्याला माजी शिक्षक जे. एन. प्रियोळकर, बी. एल. सामंत, माजी मुख्याध्यापक दिवाकर राऊळ, प्रमिला राणे-सावंत, शशिकांत साळगांवकर, बी एस मुळीक, माजी शिक्षक सुनील कदम, संस्था खजिनदार नंदकिशोर राऊळ, स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष मनोहर राऊळ, मुख्याध्यापक एम. बी. फाले, निवृत्त कर्मचारी विलास जाधव, काका बोन्द्रे, बाळा जाधव, विजया पंतवालावलकर तसेच माजी विद्यार्थी परिवाराचे अध्यक्ष शेखर पाडगावकर, उपाध्यक्ष प्रभाकर तेली, सचिव महेश गावकर, खजिनदार भाऊ देवळी, गुरुनाथ नार्वेकर, हेमंत खानोलकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा नाटेकर-राऊळ यांनी केले. स्नेहभोजन आणि पसायदानाने या अविस्मरणीय सोहळ्याची सांगता झाली. यावेळी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा