वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाचा भात खरेदी शुभारंभ उद्या,शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
वैभववाडी –
वैभववाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित यांच्या वतीने सन २०२५-२६ या वर्षासाठी शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत भात खरेदीचा शुभारंभ सोमवार, २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम वैभववाडी येथील तालुका खरेदी विक्री संघ कार्यालयात पार पडणार आहे.
शासकीय आधारभूत किंमत योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य दर मिळणार असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे चेअरमन श्री. प्रमोद रावराणे, व्हाईस चेअरमन श्री. अंबाजी भा. हुंबे आणि व्यवस्थापक श्री. सिध्देश सु. रावराणे यांनी केले आहे. या प्रसंगी खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहेत.तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची संधी असून, शुभारंभ प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
