सावंतवाडी:
सातार्डा ते कवठणी या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण आणि संरक्षक भिंतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, अवघ्या काही दिवसांतच हा रस्ता उखडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, येत्या आठ दिवसांत या रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा सज्जड इशारा शिवसेना ओबीसी व व्हीजेएनटी विभागाचे जिल्हाप्रमुख सुदन कवठणकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
कवठणी येथील संरक्षक भिंतीसाठी २०२२-२३ च्या बजेटमध्ये सुमारे २.५ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली होती, ज्याचे काम २०२४-२५ मध्ये पूर्ण करण्यात आले. मात्र, हे काम निकृष्ट असल्याचे श्री. कवठणकर यांनी वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. सध्या या ठिकाणी संरक्षक भिंतीला पाईप टाकून मोरीचे काम करण्यात आले असले, तरी बाजूला टाकलेले बोल्डर्स अजूनही तसेच पडून आहेत. तसेच सुमारे १ कि.मी. अंतराचे डांबरीकरण झाले असले तरी साईडपट्ट्यांचे काम अद्याप प्रलंबित आहे. या विखुरलेल्या साहित्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, एखादी दुर्घटना घडल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे.
प्रशासनाने संबंधित ठेकेदाराकडून हे काम तातडीने पूर्ण करून घ्यावे, अन्यथा आठ दिवसांनंतर आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असे सुदन कवठणकर यांनी स्पष्ट केले आहे.
