हार-जीत येत राहते, जनसेवा मात्र अखंड – समीर नलावडे
कणकवली
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला असला तरी कणकवलीकर जनतेची सेवा यापुढेही सुरू ठेवणार असल्याची ग्वाही माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली आहे. त्याच उद्देशाने त्यांनी ‘समीर नलावडे जनसंपर्क कार्यालय’ सुरू केले असून, या माध्यमातून नागरिकांच्या समस्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
नव्याने सुरू झालेल्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नलावडे म्हणाले की, नागरिकांना थेट संवाद साधता यावा, मनमोकळेपणे आपल्या अडचणी मांडता याव्यात, यासाठी हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. हे कोणत्याही पक्षाचे नसून वैयक्तिक जनसंपर्क कार्यालय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावण्यात आला असून प्रवेशद्वाराजवळ नेते नारायण राणे आणि पालकमंत्री नीतेश राणे यांचे फोटो आहेत.
नागरिक नगरपंचायतीच्या कामांसाठी सकाळपासून दुपारपर्यंत येतात, त्या वेळेतच हे कार्यालय खुले राहील. गरज भासल्यास कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दिलेल्या मोबाईल क्रमांकावरही संपर्क साधता येईल, असे नलावडे यांनी सांगितले.
कणकवलीकर जनतेने भाजपला बहुमत दिले असल्याने शहराच्या विकासासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. विकासकामांना शंभर टक्के पाठिंबा देण्यात येईल, मात्र नगरपंचायतीत चुकीची कामे झाल्यास आमचे नगरसेवक त्याला ठाम विरोध करतील, अशी भूमिका त्यांनी मांडली. पालकमंत्री नीतेश राणे यांच्या माध्यमातून शहरासाठी अधिकाधिक निधी मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही ते म्हणाले.
निवडणुकीतील पराभवाबाबत बोलताना नलावडे म्हणाले की, काही प्रभागांत त्यांना तर काही ठिकाणी त्यांच्या उमेदवारांना जास्त मते मिळाली. कधी कधी मतदारांना बदल अपेक्षित असतो, त्यामुळे असे निकाल लागतात. निवडणुकीत पराभव झाला असला तरी भाजपचे नऊ नगरसेवक विजयी झाले असून जनतेने भाजपलाच बहुमत दिले आहे, असे त्यांनी नमूद केले.
नगरपंचायत आमच्या ताब्यात असताना पर्यटन महोत्सवासारखे विविध उपक्रम राबवले गेले. पुढील काळातही सहकाऱ्यांशी चर्चा करून शहराच्या हिताचे निर्णय घेतले जातील. मिळालेल्या साडेतेरा कोटी रुपयांच्या निधीतून प्रस्तावित कामे लवकरच सुरू होतील, असेही नलावडे यांनी सांगितले.
पराभव-जय याकडे समतोलपणे पाहण्याची शिकवण नारायण राणे यांच्याकडून मिळाल्याचे सांगत, पराभवाला न घाबरता कणकवलीकरांच्या सेवेसाठी सतत कार्यरत राहणार असल्याचा निर्धार समीर नलावडे यांनी व्यक्त केला.
