जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न
सावंतवाडी :
सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचा जिल्हास्तरीय ज्ञानदीप पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. श्रीराम वाचन मंदिर येथील सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत होते. यावेळी ज्येष्ठ संपादक गजानन नाईक, सीए लक्ष्मण नाईक, श्रीराम वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष रमेश बोंद्रे, स्वागताध्यक्ष अभिमन्यू लोंढे, संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक, अध्यक्ष जावेद शेख, संपादक सागर चव्हाण, व्ही. टी. देवण, संप्रवी कशाळीकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
समाजाभिमुख व विधायक कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कार्यातून इतरांना प्रेरणा मिळावी या प्रामाणिक हेतूने ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे गेली १९ वर्षे हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. यावर्षीप्रमाणेच यंदाचे पुरस्कार सौ. रेश्मा रा. भाईडकर आणि व्ही. टी. देवण यांच्या पुरस्कृत सहकार्याने प्रदान करण्यात आले.
यावेळी ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे पुढील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला —
कु. स्नेहा विठ्ठल कदम (माणगाव), सौ. शुभेच्छा सावंत (बांदा), मंदार चोरगे (वैभववाडी), सचिन वंजारी (कणकवली), राजाराम फर्जंद (दोडामार्ग), शैलेश तांबे (वेंगुर्ला), रोहन पाटील (दाणोली), राजेश कदम (देवगड), कांचन उपरकर (सावंतवाडी), अविनाश म्हापणकर (सावंतवाडी) — यांना गौरवपत्र, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दाणोली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. प्रास्ताविकात संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक यांनी संस्थेच्या १९ वर्षांच्या कार्याचा सविस्तर आढावा मांडला.
यावेळी ज्ञानदीपचे कार्याध्यक्ष निलेश पारकर, खजिनदार एस. आर. मांगले, उपाध्यक्ष एस. जी. साळगावकर, कवी विठ्ठल कदम, वैभव केंकरे, आर. व्ही. नारकर, एकनाथ धोंगडे, सुनील नेवगी, दीपक गांवकर, सुनील कदम, पांडुरंग कातकर यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत गावडे यांनी केले, तर सहसचिव विनायक गांवस यांनी आभार मानले.
