*वेंगुर्ल्यात अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त सायकल रॅली व वृक्षारोपण*
वेंगुर्ला :
भारतरत्न, माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त संस्कृती मंत्रालय, भारत सरकार तसेच कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथे भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या सायकल रॅलीचा शुभारंभ वेंगुर्ल्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री. दिलीप गिरप यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सचिन बिडकर, जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई, खर्डेकर कॉलेजचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी, नगरसेविका श्रीम. अॅड. सुषमा खानोलकर, ज्येष्ठ साहित्यिका श्रीम. वृंदा कांबळी, खर्डेकर कॉलेज संस्था प्रतिनिधी श्री. सुरेंद्र चव्हाण, तरुण भारत प्रतिनिधी श्री. महेंद्र मातोंडकर, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे सचिव डॉ. श्री. सचिन परुळेकर, कोकण संस्था अध्यक्ष श्री. दयानंद कुबल, समन्वयक श्री. शशिकांत कासले, श्रीम. स्वाती मांजरेकर, श्री. सत्यवान भगत यांच्यासह विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायकल रॅलीनंतर अटलजींच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मान्यवर व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अटलजींच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला.
भारताच्या राजकीय व सांस्कृतिक जीवनावर अमीट छाप उमटविणारे अटल बिहारी वाजपेयी हे एक प्रभावी वक्ते, संवेदनशील कवी आणि दूरदृष्टी असलेले नेते होते. पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प, सुवर्ण चतुर्भुज योजना, पोखरण अणुचाचण्या यांसारख्या ऐतिहासिक निर्णयांद्वारे देशाच्या विकासाला नवी दिशा दिली. “राष्ट्र प्रथम” या विचाराने त्यांनी संपूर्ण देशाला प्रेरणा दिली.
अटलजींच्या १०० व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली ही सायकल रॅली व वृक्षारोपणाची संकल्पना युवकांमध्ये देशभक्ती, आरोग्य जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ठरली. या प्रेरणादायी उपक्रमाबद्दल आयोजक संस्था व सहभागी सर्व घटकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
*चौकट :*
सायकल रॅलीद्वारे अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतींना उजाळा देणारा उपक्रम राबवणाऱ्या कोकण एनजीओ इंडिया संस्थेचे कौतुक करावेसे वाटते. पर्यावरण संरक्षण, स्वच्छता व शाश्वत विकासाचा संदेश देणारे अटलजींचे विचार या रॅलीतून प्रभावीपणे पोहोचतात. पर्यावरणप्रेम आणि देशप्रेम यांची सांगड घालणारा हा उपक्रम प्रेरणादायी आहे.
— नवनिर्वाचित वेंगुर्ले नगराध्यक्ष श्री दिलीप गिरप
फोटो : वेंगुर्ले नगराध्यक्ष श्री दिलीप गिरप, कोकण संस्था अध्यक्ष श्री. दयानंद कुबल आणि विद्यार्थी सायकल रॅलीमध्ये सहभागी
