You are currently viewing हार्ट हॉस्पिटलचा एक दीपस्तंभ धीरूभाई सांगाणी

हार्ट हॉस्पिटलचा एक दीपस्तंभ धीरूभाई सांगाणी

 

आज अमरावतीचे श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध झालेले आहे. हृदयशस्त्रक्रिया विनामूल्य करणारे किंवा कमीत कमी पैशात करणारे हे भारतातील अग्रगण्य इस्पितळ आहे. नुकतीच या हॉस्पिटलची आठ मजली इमारत तयार झाली आहे. या सर्वांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. श्री देवेंद्रजी फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीनजी गडकरी यांचे भरघोस आशीर्वाद लाभलेले आहेत. इथली हृदयशस्त्रक्रिया ही आवश्यक असल्यासच करण्यात येते. आजच्या घटकाला हजारो शस्त्रक्रिया इथे झालेल्या आहेत.

 

या हार्ट हॉस्पिटलचा इतिहास मोठा रंजक आहे. श्री संत अच्युत महाराज यांच्या शेजारी तपोवनला मी राहत होतो. तेव्हा या हार्ट हॉस्पिटलचे बीजारोपण झालेले आहे. त्या बिजारोपणामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यामध्ये सुप्रसिद्ध उद्योजक श्री धीरूभाई सांगांणी अभियंता श्रीमती उषा ठुसे व अभियंता श्री प्रकाश पोतदार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर आज नवीन कार्यकारिणीमध्ये असलेले डॉ. अनिल जावरकर श्री नितीन गडकरी यांचे निकटम श्री सुधीर दिवे श्री मनोज वाडेकर श्री मुरलीधर वाडेकर यांनी हे रुग्णालय राज्य व राष्ट्रीय पातळीवर पोहोचवून दिले आहे .

 

या हॉर्ट हॉस्पिटलची सुरुवातीला साने गुरुजी मानव सेवा संघापासून झाली. या संघाचे सर्वेसर्वा हाडाचे शिक्षक श्री प्रभाकर जावरकर हे दरवर्षी हृदयशस्त्रक्रिया निदान शिबिर आयोजित करायचे. मुंबईवरून डॉक्टर यायचे आणि मग जे रुग्ण आजारी आहेत त्यांना मुंबईला बोलावून त्यांचे ऑपरेशन केले जायचे.

 

दरवेळेस मुंबईला जाण्यापेक्षा आपण अमरावतीलाच श्री संत अच्युत महाराज यांच्या नावाने हार्ट हॉस्पिटल का सुरू करू नये असा विचार श्री धीरूभाई सांगानी श्रीमती उषा ठुसे व श्री प्रकाश पोतदार यांच्या मनात आला व तो त्यांनी श्री संत अच्युत महाराज यांना बोलवून दाखवला. सुमारे पंचवीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट. तेव्हा फारसा सीएसआर फंड फारसा निधी उपलब्ध नव्हता. विशेष म्हणजे चार चाकी गाडी देखील या मंडळीकडे नव्हती. धीरूभाईंनी या कामात पुढाकार घेतला. उषा ठुसे धीरूभाई व प्रकाश पोतदार लोकांकडे फिरायला लागले .लोक देणगी देऊ लागले. श्री संत अच्युत महाराज यांचा भक्त परिवार मोठा आहे. श्री संत अच्युत महाराज त्यांच्या कार्यक्रमातून संकलित होणार निधी तपोवन या कुष्ठरोग यांच्या संस्थेला देत होते. पुढे या हार्ट हॉस्पिटल साठीही त्यांनी लोकांना आवाहन केले आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ ते मार्डी रोडवर या हॉस्पिटलसाठी जागा घेतल्या गेली आणि तिथे उभे राहिले ते श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल. श्री धीरूभाई सांगानी तसे रियल इस्टेटचा कारभार करणारे. या काळात रियल इस्टेटचा उगमही झाला नव्हता. त्या काळात धीरूभाईंनी अमरावती शहरामध्ये डझनांनी नगरे बसवली. अनेक प्लॉट विकले. परंतु त्यांनी परोपकाराचा समाजकार्याचा वारसा म्हणून श्री संत अच्युत महाराज हॉट हॉस्पिटल कडे पूर्ण झोकून दिले.

 

ही मंडळी मोटरसायकलने फिरायची. प्रत्येक शहरात दानशूर लोक ठरलेले असतात. स्वतः धीरूभाई हे गुजराती असल्यामुळे गुजराती मारवाडी जैन या लोकांमध्ये त्यांचा वावर होता. त्यांनी सढळ हातांनी धीरूभाईंना मदत केली. धीरूभाई तेवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी परगावी असणाऱ्या आपल्या मित्रांशी आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधला आणि हार्ट हॉस्पिटलला मदत करण्याची विनंती केली. अर्थातच श्री संत अच्युत महाराज यांचा नावलौकिक चांगला असल्यामुळे या त्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला.

 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ ते मार्डी रोडवर श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल उभे झाले तेव्हा या भागात फारशी वर्दळ नव्हती .जाण्याच्या सुविधा नव्हत्या .पण विनामूल्य ऑपरेशन करण्याची सोय असल्यामुळे तसेच योग्य निदान करीत असल्यामुळे या रुग्णालयाला चांगला प्रतिसाद मिळाला. या रुग्णालयात आल्यानंतर तुमची तपासणी केली जाते आणि आवश्यक असेल तरच शस्त्रक्रिया केली जाते. इतरत्र मात्र फसवणूक होते .कारण नसताना हार्ट ऑपरेशन केले जातात .तो प्रकार संत अच्युत महाराज हॉस्पिटल मध्ये आजपर्यंत झाला नाही आणि भविष्यातील होणार नाही.

 

धीरूभाई सांगाणि उषा छोटेसे व श्री प्रकाश पोतदार यांनी आपल्या जिवाचे रान केले .आपल्या रक्ताचे पाणी केले आणि श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल

नावारूपाला आणले .आज धीरूभाईंचे वय 90 वर्षाचं आहे .पण प्रकृती ठणठणीत आहे. त्यांचे माझ्याकडे माझ्याकडे येणे जाणे आहे. ते आमच्या मिशन आय ए एस.ला नेहमीच सहकार्य करतात. मला नेहमी म्हणतात. काठोळे सर तुम्हाला काही मदत लागली किंवा कोणालाही कोणत्याही संस्थेला आर्थिक मदत लागली तर मला सांगा. मी आर्थिक मदत करायला तयार आहे. असे देणगीदार फार कमी असतात. स्वतःहून मी देणगी द्यायला तयार आहे असे म्हणणारे तर निराळेच वेगळेच लोक असतात .

 

धीरूभाईंच्या आणि माझ्या घरामध्ये जास्त अंतर नाही. यांचा माझा परिचय झाला तो शासकीय विदर्भ महाविद्यालयातील इंग्रजीचे लेखक व कवी प्रा. ओ पी भटनागर यांच्याकडे.

तो वाढतच गेला आणि मी श्री संत अच्युत महाराज यांच्या अगदी शेजारी राहत असल्यामुळे तो दृढ झाला. अच्युत महाराज गावात नसले किंवा ध्यानात असले तर धीरूभाई आणि उषाताई माझ्याकडे येऊन बसायच्या. चर्चा व्हायची. पण त्यांच्या डोक्यात सदा सर्वदा एकच विषय असायचा. श्री संत अच्युत महाराज हार्टहॉस्पिटलचा विकास.

 

धीरूभाई नेहमी पांढरे कपडे घालतात आणि त्यांचे विचारही तेवढेच स्वच्छ आहेत आणि म्हणूनच एक रियल इस्टेट मधला माणूस एक एवढे मोठे हार्ट हॉस्पिटल उभारू शकला त्यासाठी अनेक मदतीचे हात अनेक कार्यकारणीचे सदस्य अनेक लोकप्रतिनिधी त्यांच्या मदतीला आले. परंतु जोपर्यंत मूल रडत नाही तोपर्यंत आई दूध पाजत नाही हे प्रचलित आहे. जोपर्यंत तुम्ही त्या माणसाकडे जात नाही. तोपर्यंत तो देणगी देईलच असे नाही. धीरूभाईंनी उषाताईंनी पोतदारांनी ते काम केले .घरोघरी हिंडले. उन्हातानात फिरले. मोटरसायकलवर हिंडले. आणि एक स्वप्न साकारले. आज धीरूभाई ९० वर्षाचे झाले आहेत .पण त्यांचा उत्साह अजूनही कायम आहे आणि तो असाच कायम राहावा अशी अपेक्षाही आहे. त्यांना सुखी संपन्न दीर्घायुष्य लाभो ही मनोमन इच्छा व्यक्त करतो .

 

आज श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल खूप मोठे झाले आहे .आठ मजली झाले आहे आणि आता देणगीसाठी कुठे जाण्याची गरज नाही .लोक स्वतःहून या हॉस्पिटलला देणगी देत आहेत. अमरावतीच्या मार्डी रोडवरील हे हॉस्पिटल आता विनामूल्य आणि कमी पैशांमध्ये हृदय शस्त्रक्रिया करून देणारे हॉस्पिटल म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रचलित झालेले आहे. त्या कामी या त्रिमूर्तींनी व त्यांच्या सर्व कार्यकारिणींनी घेतलेल्या परिश्रमाला त्रिवार वंदन.

 

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक

मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

9890744160

प्रतिक्रिया व्यक्त करा