You are currently viewing भातुकलीचा खेळ लुप्त झालाय…

भातुकलीचा खेळ लुप्त झालाय…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित लघुलेख*

 

भातुकलीचा खेळ लुप्त झालाय….

 

भातुकली..‌‌आजच्या भाषेत मिनी संसार….घरात पूर्वी आजी आजोबा,काकाकाकी, आत्या असायच्या.सर्वांचं वागणं ,काम करण्याची पध्दत,कडक रागीट तसेच प्रेमळ स्वभावाचा मुले घरातच अनुभव घेत.ती व्यक्तीमत्व नकळतपणे त्यांच्या मनात रूजत असत….

भातुकलीचा खेळ हा तसाच लुटुपुटीचा,गंमतच्या संसाराचा…

पण तेव्हा मुलंमुली सकाळी लवकर उठत,शाळा ट्यूशनची वेळेची कसरत नसे.सणांना भरपूर सुट्या असायच्या……शेजारची मुलंमुली रोज खेळायला जमत…बिनपैशाचे पण शारिरीक, बौद्धिक भरपूर खेळ शाळेतून आलं की किंवा सुटीत मुलं खेळत असत.

लंगडी,लगोरी,चौसर, इतकंच नव्हे तर नाटीका बसवणं,कविता चालीत म्हणणं नृत्यबसवणं व सादर करणं..हेही त्यात अंतर्भूत असायचे….

मुलींचा खूप आवडता खेळ तो म्हणजे भातुकलीचा…घरातील ऐसपैस ओसरीत..एका कोप-याला भातुकलीचा खेळ रंगायचा.पितळी चूल तवा, पोळपाट लाटणे, .टिफीन छोटीशी पातेली,झाकण्या ,.पकडसुध्दा…तर नंतर स्टील व प्लास्टिक मधे खेळभांड्यात सुधारणा झाल्या…खेळभांड्यात गॅसची शेगडी,सिलिंडर मिक्सर,ही आले…पण भातुकलीचा खेळ तसाच राहिला.

त्यात आई बाबांची लहान भाऊ,बहीणीची भूमिका पार पाडली जायची,घरी पाहुणे येत,त्यांचं अगत्य…टेलरकडून मशीनवरील छोटे तुकडे मागून ते फ्राॅकच्या गळ्यात अडकवून नवीन कपडे म्हणून घालायचे..तर कधी ओढणीची,साडी व्हायची….भातुकलीतील आई स्वैंपाक करायची…भाजी म्हणून अंगणातीलच झाडांची पाने आणायची…तर बाबा बॅग घेऊन ऑफीसला जात.‌..झाडाच्या पानांची पत्रावळ, छोट्या वाटीने पाने गोल कापून पानांची पत्रावळ म्हणजे ताट तयार व्हायचे..व त्यावर मुरमुरे लाटून पोळी,दोन दाळव्यात गुळ भरून चिकटवला की लाडू होई.मुरमुरे,पोहे,फुटाणे,बिस्किटांचा खाऊत वापपर होत असे…

एक साग्रसंगीत पूजाही असायची त्यात…छोटंसं आरतीचं ताट ,मातीचे उदबत्ती स्टॅंड त्यात सुकी काडी उदबत्ती म्हणून,आईच्या वाणात आलेली छोटी खूप भांडी खेळात कामी येत यायची…..अंगणातील झाडाजवळ वडाची थाटात पूजा व पिकलेल्या लिंबोळ्यांचे आंबे होत मग.दोन खाटांवर चादर टाकून त्याचं छत होई घराचं.मग बाहेरच्या जगाशी दोन तीन तास संपर्कच नसायचा.भातुकली खेळतांना घरातील मोठ्या ,छोट्या व्यक्तींप्रमाणेच मुली बोलत असत.आपल्याच कल्पनाविश्वात मुली दंग असायच्या…सतत आनंदी रहायच्या..‌..जणू पुढील खरोखरच्या संसाराची त्या उजळणीच करायच्या…

हळूहळू शिक्षण‌‌…

मग परगावी शहरात मुलांना नोकरी

,घरं छोटी,माणसं कमी होत गेली, आपुलकी निवळली.शेजार दुरावले,मुलंही दोन तीनच..आता तर एकच..‌मुलांच्या शाळा इंग्रजी माध्यमाच्या झाल्या.एकटी आई कुठे कुठे काय बघणार..मग शिकवणी वर्ग आले.आणि मुलांचं खेळविश्व तिथूनच मर्यादित होऊ लागले.वेळ पुरेनासा झाला.नंतल टिव्ही आला, मोबाईल ने तर छोट्या मोठ्या सर्वांनाच आपलंसं केलं.मनोरंजनाची साधनं वाढली तशी सांघिक खेळाची गरज कमी झाली.भातुकली मांडणं ,खेळणं

आता इतिहासजमा झाल़ं..‌‌

काळाप्रमाणे बदलावं लागतंच.पण मुलांच्या भावविश्वाचा भातुकली हा अविभाज्य भाग होता.ती संसाराची रंगीत तालीमच होती जणू काही.

बदल काळानुरूप कसे घडत जातात, आपल्या कळतही नाही….आज हा विषय सुचला आणि

भातुकली नव्याने आठवली…

व त्या आठवणीत पुन्हा एकदा रममाण होता आलं…हेही खूप जमेचंच!

 

अरुणा दुद्दलवार

दिग्रस यवतमाळ @✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा