You are currently viewing वेंगुर्ल्यात शिवसेनेची नवी रणनीती; निरीक्षकपदी विद्याधर परब यांची निवड

वेंगुर्ल्यात शिवसेनेची नवी रणनीती; निरीक्षकपदी विद्याधर परब यांची निवड

सावंतवाडी :

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने वेंगुर्ला तालुक्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक विद्याधर परब यांची शिवसेनेच्या वेंगुर्ला निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आज ही नियुक्ती अधिकृतपणे जाहीर केली. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ही जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असून, पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नगरपालिका निवडणुकांनंतर वेंगुर्ला येथील शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जवळ आल्याने नव्याने संघटनात्मक बांधणी करण्याचा पक्षाचा मानस आहे. नवनियुक्त निरीक्षक विद्याधर परब हे वेंगुर्ला तालुक्यातील सर्व मतदारसंघांचा सखोल आढावा घेणार असून, त्यांच्या अहवालाच्या आधारे शिवसेनेची नवीन तालुकास्तरीय कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे.

या नियुक्तीमुळे वेंगुर्ल्यात शिवसेनेच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता असून, निवडणूक तयारीला धार मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा