मठ कुडाळ तिठा येथे भीषण अपघात :
तेंडोली येथील दुचाकीस्वार मदन मेस्त्री यांचा मृत्यू
वेंगुर्ले
वेंगुर्ले तालुक्यातील मठ कुडाळ तिठ्यावर आज मंगळवार २३ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास ओमनी चारचाकी व दुचाकी या दोन गाड्यांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेले दुचाकीस्वार मदन अच्युत मेस्त्री (वय ४५) मूळ राहणार तेंडोली हुडकुंबावाडी आणि सद्या राहणार वेंगुर्ले रामघाट यांचा जागीच मृत्यू झाला.
मयत मेस्त्री हे कुडाळ येथून वेंगुर्ले च्या दिशेने दुचाकी ने येत होते. तर त्याच दरम्यान वेंगुर्ले कडून सावंतवाडी कडे ओमनी चारचाकी गाडी जात होती. कुडाळ तिठा येथे या दोन्ही गाड्यांमध्ये समोरासमोर धडक बसून अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिकांनी वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मयत मदन यांचे भाऊ गुरुनाथ मेस्त्री यांनी वेंगुर्ले पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून चारचाकी चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत मेस्त्री हे परबवाडा येथे भाड्याने राहत होते. ते सुतारकाम करीत असत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार वर्षाची मुलगी आहे. मेस्त्री यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
