You are currently viewing घारपी शाळेत राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा

घारपी शाळेत राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा

*घारपी शाळेत राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा*

*बांदा*

महान भारतीय गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथे विविध शैक्षणिक व आनंददायी गणितीय उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी गोडी निर्माण करणे, तार्किक विचारशक्ती विकसित करणे आणि गणित हे दैनंदिन जीवनाशी निगडित आहे, ही जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवातीला शिक्षकांनी रामानुजन यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत, प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी गणिताच्या क्षेत्रात केलेली अद्वितीय कामगिरी विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितली. त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि संशोधन वृत्तीमधून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली.
यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आकारातून बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ,बरोबर‌ तसेच त्रिकोण ,चौकोन‌ अशा भौमितिक आकाराबरोबर गणितातील खास संख्या पाय असे विविध आकार बनवून घेतले‌. याचबरोबर गणिती खेळ, जलद गणना, तसेच दैनंदिन जीवनातील गणिती उदाहरणे फलकावर स्पष्ट करून दाखवली..या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती कमी होऊन आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले.
कार्यक्रमाच्या शेवटी गणित विषयाचे महत्त्व विषद करत गणित म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ नसून विचार करण्याची शिस्त आहे हा संदेश देण्यात आला. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक जे.डी.पाटील याचबरोबर सहकारी शिक्षक मुरलीधर उमरे आशिष तांदुळे धर्मराज खंडागळे यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा