*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम बालकविता*
*कुकूच कू*
कुकूच कू करतो कोंबडा
म्हणतो पहाटेचे वाजले चार
वेळ कशी अचूक कळते
मला नवल वाटते फार
त्याची आई उठवते का
त्यास हलवुन हलवुन
बांग देण्याचा सराव ती
घेत असेल का करवून
रोज, रोज, तेच, तेच
येत नसेल का कंटाळा
आई येताना दिसली तर
म्हणतो का पळा पळा
नाही अभ्यास, नाही परीक्षा
नाही शाळेमध्ये जाणे
इकडे तिकडे फिरून फक्त
टिपत असतो दाणे
लाल तुरा डौलदार
काय त्याची शान
रंगीबेरंगी कोट घालुन
ऐटीत फिरतो छान
@भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत
