You are currently viewing भारतीयांनी संविधान एक धर्मग्रंथ…

भारतीयांनी संविधान एक धर्मग्रंथ…

*ज्येष्ठ लेखक कवी भूमिपुत्र वाघ लिखित अप्रतिम लेख*

 

*भारतीयांनी संविधान एक धर्मग्रंथ..*

 

वरील विषय घेऊन आपण आत्मचिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत.भारत देश स्वतंत्र झाला.तेव्हा कोणती मुल्य,कोणता विचार घेऊन हा देश पुढे चालणारं,याचा देशवाशीयांनी खूप विचार अभ्यास तर्क वितर्क शोधून भारतीय संविधान निर्माण करण्यासाठी एक समिती निर्माण केली.जगातल्या अनेक राज्यघटनेचा अभ्यास करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सार्वभौम जनकल्याणचं भारतीय संविधान देशाप्रती अर्पण केलं.आणि भारत देशांनी ते स्वीकारलं.देशामध्ये अनेक धर्म,रिती, रिवाज चाली रीती, संस्कृती,विचार,भाषाआहेत त्या प्रत्येक विचाराला स्वीकारलं.जाती आणि त्यांच्या परंपरेला स्वीकारलं.मानवी मूल्य घेऊन त्याच्या नैतिकतेला स्वीकारलं.सर्व जाती आणि धर्माला समान न्यायाच्या बाजूने स्वीकारलं. शिक्षणाचा अधिकार,निवासाचा अधिकार,प्रॉपर्टी संपादन करण्याचा अधिकार,अनेक अधिकार देऊन इथल्या माणसाला जगण्याचं, विचाराचं,स्वातंत्र्य दिलं.मतदानाचा अधिकार दिला,देश चालवणारा व्यक्ती निवडण्याचा अधिकार दिला. हे सर्व लोकशाही मूल्य अंगीकृत करण्याचा मार्ग मोकळा करून दिला.जगातल्या प्रत्येक धर्माच्या पलीकडे जाऊन *भारतीय संविधानाने लोकांना स्वातंत्र्य दिलं.स्वातंत्र्य,समता,न्याय आणि बंधुत्व ही चार मूल्य बहाल केली.याहुनी जगात सर्वात मोठा धर्मग्रंथ नाही.* हे ठामपणे सांगावसं वाटतं.

जगातल्या अनेक धर्माचा थोडासा जरी अभ्यास केला तरी प्रत्येक धर्मग्रंथ हें पुरुषी अहंकारातून लिहिले गेलेले आहेत.प्रत्येक धर्मग्रंथांमध्ये बाईची उपेक्षा केल्याचे दिसते.कारण नसताना देव नावाचं भूत प्रत्येकाच्या मालगुटीवर बसविल्याचे दिसते.देवाच्या नावाने माणसाच्या मनामध्ये भीती निर्माण करून त्याचं शोषण केल्याचे दिसते.परंतु भारतीय संविधानामध्ये कुठेही अधार्मिकता दिसत नाही.देव आणि दैववाद दिसत नाही.की कोठेही भीती निर्माण केल्याचे दिसत नाही.

खरंतर भारतीय संविधान हा पवित्र धर्म ग्रंथ मानायलाच हवा.यातून जातीयभेद कमी होतील.देशामध्ये प्रत्येक मानव जातीमध्ये शहिष्णुता वाढेल.स्त्री पुरुष समानता सांधली जाईल.हिंसाचार,अत्याचार,खून मारामारी,दरोडे,व्यभिचार या सर्व गोष्टीला बाजूला हटवण्यासाठी प्रत्येक माणूस काम करेल.भ्रष्टाचार मुक्त भारत देश होईल.भयमुक्त समाज निर्माण होईल.कारण धर्मग्रंथ म्हटलं की प्रत्येक माणसाच्या मनावरती धार्मिक अधिष्ठान निर्माण होईल.शहिष्णुता निर्माण होईल.देशप्रेम,देशभक्ती हा विचार दृढ होईल.सांघिक विचार, सर्वव्यापी विकास त्याचं वलय निर्माण होईल.आणि त्यातून माणूस वाईट गोष्टी करायला थांबेल. चांगल्या गोष्टीचा स्वीकार करेल. सामाजिक बदलाची मूलतत्त्वे माणसाच्या मनावरती बिंबवली जातील. यातून सर्वांचा विकास सर्वांसोबत विकास.हा विचार पुढे दृढ होईल.

भारत देशामधील एक उदाहरण अनुभवाचे झाल्यास,जेव्हा आषाढी विठ्ठल भेटीची वारी सुरू होते.तेंव्हापासून ते वारी समाप्त होईपर्यंत,त्या वारीत महाराष्ट्रातलेच नाही तर जगाच्या पाठीवरचे लाखो लोक एकत्र येतात.तेथे शिवीगाळ होत नाही,भांडण होत नाही, मारामारी होत नाही,कुठलीही हिंसा होत नाही.जात विचारली जात की धर्म विचारला जात नाही. प्रत्येकाच्या मुखामध्ये फक्त माऊली हा शब्द असतो.विठ्ठलाच्या नामघोषामध्ये तो आपला मार्ग क्रमित असतो.लाखो लोक चालत असतात.प्रत्येकाची सोय आपोआप होत असते.तिथे राग,द्वेष,मोह,मद,मत्सर,अहंकार हे षडविकार सर्व गळून पडतात. हे फक्त वारीत घडतं. हे जर विठ्ठलाच्या प्रती प्रत्येक माणसांच्या मनात असलेली सद्भावना येथे अशी निर्माण होते तर तोच विचार भारतीय संविधानाप्रती निर्माण झाल्यास या देशाचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही. जगाचं लक्ष या देशाकडे लागलेलं असेल.ही संकल्पना असली तरी ती वास्तवाकडे घेऊन जाणारी आहेचं त्यासाठी प्रत्येक माणसाच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे आवश्यक आहे. सर्वव्यापी विकासाची मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रत्येकाच्या मनामध्ये भारतीय संविधान हा धर्मग्रंथ आहे,असे रुजण्यासाठी इथली मलीन झालेली न्यायव्यवस्था,इथली अविचारी धर्म व्यवस्था,इथली भ्रष्ट झालेली नीतिमता,ढासळलेली अर्थव्यवस्था,खुर्चीच्या लालसेपोटी विचार घाण ठेवलेली राज्य व्यवस्था, आणि इथली मूळ शिक्षण व्यवस्था बदलणे अत्यंत आवश्यक आहे.त्यात सुधारणा करणे गरजेचे आहे.

एका बाजूला धर्माच्या नावाखाली हजारो धर्मस्थळातील सोन्याचे गाभारे भरलेले आहेत.दुसऱ्या बाजूला प्रचंड भ्रष्टाचाराणे उच्छाद मांडलेला आहे.तर दुसऱ्या बाजूला गरिबीच्या,जातीच्या,धर्माच्या प्रचंड खोलवर दऱ्या विखुरलेल्या आहेत. दोन जाती,दोन धर्म एकमेकांच्या वरती शस्त्र उचलतात.भर दिवसा महिलेची धिंड काढली जाते. राज्यसत्ता आणि न्यायव्यवस्था डोळ्याला पट्टया लावून स्तब्ध राहते. बाघ्याची भूमिका घेत राहते.

हे सर्व बदलू शकतो काय?असा प्रश्न समोर आल्यास होय ते शक्य आहे असेचं उत्तर येईल.

त्यासाठी शिक्षणामध्ये संविधान हा धर्मग्रन्थ आहे.याची मूलतत्त्वे लहान मुलांना शिकवावी लागतील. बालमलावर संविधानाच्या प्रत्येक कलमाचा जागर करावा लागेल. संविधान शिक्षण हे सर्वांसाठी खुले करावे लागेल.ते विचार आणि कृती आचरणात आणण्यासाठी शिक्षकांना तयार करावं लागेल. शिक्षक जणू धर्म प्रचारक आहेत अशा शिक्षकांची निर्मिती करावी लागेल.कारण नव समाज निर्माण करावयाचा झाल्यास शिक्षण व्यवस्था ही पवित्र असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाच्या मनावरती सविधान हा धर्मग्रंथ आहे,असे विचार बिंबविणे अत्यंत आवश्यक आहे.यातूनच नव्या समाजाची निर्मिती होईल. मानवी जीवनाच्या विकासासाठी निर्माण केलेली सर्व नियम, नियमावली,आणि कलमे ही प्रत्येक माणसाने अंगीकृत केल्यास धर्माचे रीती रिवाज आहेत असे गृहीत धरून त्यास स्वीकारल्यास मग हिंसा होणार नाही.अत्याचार होणार नाहीत. प्रॉपर्टी पैसा आणि पदासाठी येथे खून मारामाऱ्या होणार नाहीत.यातूनच मूल धर्माची आचार संहिता म्हणून या संविधानास धर्मग्रंथाचा दर्जा निर्माण होईल. यातून सर्व मानवांच्या जीवांच्या कल्याणाचा मार्ग सुखकर होईल….

प्रतिक्रिया व्यक्त करा